
मुंबई : बहुचर्चित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा खुला करून राज्यातील जनतेचा प्रवास सुखकर होईल, अशी आशा होती. मात्र एमएसआरडीसीकडून सर्व नियोजन पूर्ण असूनही केवळ राजकीय गोंधळामुळे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पुन्हा लांबणीवर टाकण्यात आले आहे. त्यामुळे नाशिकहून मुंबईकडे जलद प्रवासाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार, १ मे रोजी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्यात या महामार्गाचे अनावरण करण्यात येईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मात्र पंतप्रधान मुंबईत येऊन गेले, पण समृद्धी महामार्गाच्या अनावरणाचा मुहूर्त मात्र टळला.
त्यामुळे समृद्धी महामार्गाचे अनावरण मोदी करणार की फडणवीस, असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. इगतपुरी ते आमण हा टप्पा ७६ किलोमीटरचा असून नाशिक ते मुंबई हे अंतर केवळ अडीच तासांत पूर्ण होणार आहे. ७०१ किलोमीटर लांबीच्या या महामार्गातील ६२५ किलोमीटरचा भाग आधीच वाहतुकीसाठी खुला झाला आहे. शेवटचा टप्पा पूर्ण असूनही केवळ उद्घाटनाचा मुहूर्त न मिळाल्याने हा मार्ग नागरिकांसाठी खुला होऊ शकला नाही.