
शहापूर : नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा इगतपुरी येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ५ जून रोजी होतं असतानाच या समृद्धी महामार्गाची शहापूर एक्झिट असलेला खुटघर ते शहापूर येथील मुंबई - नाशिक जुना महामार्ग पर्यंतचा रस्ता पूर्णतः खड्ड्यात गेला आहे. या ३ किमी अंतरात असलेले भातसा नदी व आवरे नदीवरील पूल कुमकुमवत असल्याने महाड येथील सावत्री नदीसारखी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी नागपूर - मुंबई समृद्धी महामार्ग निर्माणाकरिता असतानाच महामार्गाचे एक्झिट असलेले रस्ते देखील आपल्या ताब्यात घेऊन तेथील रस्ते व पूल चांगल्या दर्जाचे करण्याचे योजले होते. त्यामुळे शहापूर ते मुरबाड असलेला रस्ता महामंडळाने आपल्या ताब्यात घेऊन हा रस्ता सिमेंटचा करण्यास ७ वर्षांपूर्वी सुरू केले होते. मात्र ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे आतापर्यंत हा रस्ता पूर्णत्वास गेलेला नाही. समृद्धीची शहापूर एक्झिट असलेला खुटघर-दोऱ्याचा पाडा येथून शहापूरकडे येणार सिमेंटचा रस्ता जागोजागी अपुरा ठेवण्यात आलेला आहे, तर सापगांव येथील भातसा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल हा अखेरच्या घटका मोजत असून नदीवरील दोन्ही बाजूला संरक्षक कठडे नाहीत.
पावसाळ्यात अनेक वेळा या मुंबईला पाणीपुरवठा करणारे भातसा धरण ओसंडून वाहू लागल्यानंतर भातसा नदीवरील ब्रिज पाण्याखाली गेल्याने शहापूरशी संपर्क तुटत असतो. याच रस्त्यावर शहापूरकडे येत असताना कांबारे पावर हाऊसजवळ असलेल्या आवरी नदीवरील पूल देखील असाच धोकादायक असून पाऊसकाळ्यात यावर देखील पाणी असल्याने अनेक वेळा वाहतूक बंद झालेली आहे.
"सापगांव येथील भातसा नदीवरील पुलाचे संरक्षक कठडे वाहून गेले आहेत. रस्ते विकास महामंडळाने समृद्धी उद्घाटनाआधी या पुलावर संरक्षित उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा महाड येथील सावित्री नदीवरील अपघाताची पुनरावृत्ती येथे घडण्याची शक्यता अधिक आहे." - गिरीष अंदाडे, माजी सरपंच, सापगांव