पक्षप्रवेशाची लाट! संदीप नाईकांनी फुंकली 'तुतारी', निलेश राणेंचा आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; बडोले अजितदादा गटात दाखल

विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असल्यामुळे या दोन्ही आघाड्यांमधील पक्षांमध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची जोरदार आवक-जावक सुरू आहे.
संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला
संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाएक्स
Published on

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार असल्यामुळे या दोन्ही आघाड्यांमधील पक्षांमध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची जोरदार आवक-जावक सुरू आहे. राजकीय समीकरणांमुळे तिकीट मिळण्याची शक्यता दुरावल्याने वा काही कारणाने अडगळीत पडलेले अनेक नेते मरगळ झटकून पक्षबदल करीत तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. त्यामुळे सध्या विविध पक्षांमध्ये पक्षप्रवेशाच्या सोहळ्यांची सध्या लाट आली आहे.

भाजपकडून ऐरोली विधानसभेची उमेदवारी मिळालेले नवी मुंबईतील प्रमुख प्रस्थ असलेल्या गणेश नाईक यांचे सुपुत्र संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. माजी मंत्री राजकुमार बडोले हे मंगळवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाले. तसेच भाजपचे खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे हे बुधवारी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत.

बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपने तिकीट नाकारल्यानंतर पक्षनेतृत्वावर नाराज झालेले भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार संदीप नाईक यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. निर्धार मेळाव्याचे आयोजन करून संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तुतारी फुंकली आहे.

यावेळी संदीप नाईक यांच्यासमवेत माजी महापौर, माजी उपमहापौर, माजी स्थायी समिती सभापती, माजी विरोधी पक्षनेते, आदी २९ लोकप्रतिनिधी यांच्यासह भाजप महिला जिल्हाध्यक्षा, इतर सेलचे पदाधिकारी आणि इतर पक्षीय पदाधिकारी यांनीही राष्ट्रवादी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला. दरम्यान, संदीप नाईक यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे आता बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मंदाताई म्हात्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) संदीप नाईक यांच्यात थेट सामना होणार आहे.

काही महिन्यांपूर्वी राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केल्यानंतर माजी खासदार निलेश राणे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले होते. मात्र वडील आणि भाऊ भाजपचे लोकप्रतिनिधी असताना त्यांनी थेट भाजपला रामराम करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत निलेश राणे यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे.

या प्रवेशाच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शनही करण्यात येणार आहे. त्यामुळे कुडाळ मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यासमोर आता निलेश राणे यांचे आव्हान असणार आहे. मंगळवारी दुपारी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत निलेश राणे यांनी आपल्या शिवसेना पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा केली. यावेळी माजी नगराध्यक्ष विनायक राणे आणि नगरसेवक राकेश कांदे व निलेश राणे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे अजित पवारांना विदर्भात मोठे बळ मिळणार आहे. राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. राजकुमार बडोले यांच्यासारख्या अनुभवी नेत्याचा पक्षात समावेश केल्याने पक्षाची स्थिती मजबूत होईल, असे अजित पवार म्हणाले.

अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलेले राजकुमार बडोले यांचा गोंदिया भागात मोठा प्रभाव आहे. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे या महत्त्वाच्या भागात पक्षाची स्थिती मजबूत होणार आहे. माजी मंत्री राजकुमार बडोले हे २००९ ते २०१४ पर्यंत भाजपकडून पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत ते दुसऱ्यांदा मोरगाव अर्जुनी विधानसभेतून आमदार झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या मंत्रिपदी त्यांची वर्णी लागली होती.

आम्हाला दिलेला शब्द नंतर फिरवला - संदीप नाईक

२०१९ मध्ये अशा काही परिस्थितीमुळे आम्हाला पक्षबदलाचा निर्णय घ्यावा लागला होता. नवी मुंबईच्या विकासासाठी निर्णय घ्यावा लागला होता. मी दोन टर्म आमदार असतानाही विकासासाठी थांबावे लागले. लगेचच निवडणुका लागल्या. यानंतर आम्ही आणि आमच्या कार्यकर्त्यांनी जोमाने काम करून ऐरोली आणि बेलापूरमध्ये भाजपचे आमदार निवडून आणले. मात्र त्यावेळी आम्हाला दिलेला शब्द नंतर फिरवला गेला. माझी कोंडी झाली, पण माझ्या शहराची कोंडी झाली नाही पाहिजे. म्हणूनच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला, असे संदीप नाईक यांनी सांगितले. संदीप नाईक हे २००९ आणि २०१४ मध्ये ऐरोली मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले होते. आता त्या जागेवर त्यांचे वडील गणेश नाईक हे विद्यमान आमदार असून यंदाची निवडणूक लढवणार आहेत.

समीर भुजबळ बंडखोरीच्या पवित्र्यात

छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ हे नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्यामुळे ते बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करण्यासाठी ते उत्सुक असल्यामुळे समीर भुजबळ यांच्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा घ्या, अशा सूचना अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना दिल्याची माहिती आहे. नांदगाव मतदारसंघात सध्या शिंदेंच्या शिवसेनेचे सुहास कांदे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून लढण्यासाठी ते बंडखोरी करणार आहेत.

निलेश राणेंचे चौथ्यांदा पक्षांतर

तब्बल १९ वर्षांनी निलेश राणे शिवसेनेत परतत आहेत. शिवसेनेतून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या निलेश राणेंचे हे चौथे पक्षांतर म्हणावे लागेल. शिवसेना सोडल्यानंतर त्यांनी नारायण राणेंसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तिथून खासदारकीही मिळवली होती. त्यानंतर त्यांनी नारायण राणेंनी काढलेल्या ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ पक्षात प्रवेश केला होता. पुढे राणेंनी हा पक्ष भाजपमध्ये विलीन केला. त्यामुळे निलेश राणेही पर्यायाने भाजपमध्ये दाखल झाले. आता ते पुन्हा शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in