सांगली हादरले ,एकाच कुटुंबातील नऊ जणांचा गुढ मृत्यू

महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडकीस आली
सांगली हादरले ,एकाच कुटुंबातील नऊ जणांचा गुढ मृत्यू

जिल्ह्यातील म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील नऊ जणांचा विष पिल्याने मृत्यू झाल्याची महाराष्ट्राला हादरून सोडणारी घटना सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडकीस आली. या कुटुंबाने ठरवून आत्महत्या केली, की कुटुंबप्रमुख दोन भावांनी आपापल्या कुटुंबाला विष पाजून मग स्वतः आत्महत्या केली, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या या घटनेमागे आर्थिक संकटाचे प्राथमिक कारण समोर आले आहे. शिवाय, गुप्तधनाचा शोध, कोट्यवधी रुपये मिळवून देऊ शकेल, अशी अजब वस्तू मिळवण्याचा मोह आणि त्यातून बुवाबाजी, मांत्रिकाच्या आहारी जाणे, त्यातून कर्जबाजारीपण आल्याची माहितीदेखील पुढे आली आहे. पोपट यल्लाप्पा वनमोरे (५३), संगिता पोपट वनमोरे अर्चना पोपट वनमोरे (२५), शुभम पोपट वनमोरे (२८, सर्व रा. शिवशंकर कॉलनी, म्हैसाळ), डॉ. माणिक यल्लाप्पा वनमोरे (५०), रेखा माणिक वनमोरे (४५), प्रतिभा माणिक वनमोरे (२०), आदित्य माणिक वनमोरे (१६), श्रीमती अक्काताई यल्लाप्पा वनमोरे (७५, सर्व रा. चौंडाज प्लॉट, म्हैसाळ) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली आणि घटनास्थळावरून कळालेली माहिती अशी, की पोपट वनमोरे हे रयत शिक्षण संस्थेच्या बेडग येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांची कन्या अर्चना नुकतीच स्पर्धा परिक्षेतून यश मिळवत बँक ऑफ इंडियामध्ये कोल्हापूर येथे नोकरीला लागली होती. डॉ. माणिक वनमोरे हे खासगी पशुवैद्यक होते. दोघे भाऊ आपल्या कुटुंबासह गावातच, मात्र वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते. दोघांच्या घरामध्ये सुमारे दीड किलोमीटरचे अंतर आहे. गावात वनमोरे कुटुंबिय साऱ्यांच्या परिचयाचे होते. रविवारी रात्री दोन्ही कुटुंबे आपापल्या घरी होती. आई अक्काताई या डॉ. माणिक यांच्या घरी होत्या.

आज सकाळी डॉ. माणिक यांच्या घरातील कोणीही दूध घेण्यासाठी आले नसल्याने दूध विक्रेते त्याठिकाणी गेले. त्यावेळी घराच्या मागील बाजूचा दरवाजा उघडा दिसला. आत गेले असता त्यांना डॉ. माणिक यांच्यासह सहा जणांचे मृतदेह आढळून आले. घाबरलेल्या अवस्थेत त्या दूध विक्रेत्याने परिसरात माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. डॉ. माणिक यांचा भाऊ पोपट यांना ही माहिती देण्यासाठी परिसरातील काही लोक पोपट यांच्या घराकडे गेले. त्यावेळी त्याठिकाणी पोपट यांच्यासह त्यांची पत्नी संगिता आणि मुलगी अर्चना या तिघांचे मृतदेह दिसून आले. त्यांचा मुलगा शुभम याचा मृतदेह डॉ. माणिक यांच्या घरी आढळून आला. या घटनेमुळे साऱ्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, गावातील लोकांनी तातडीने मिरज ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोपट आणि डॉ. माणिक दोघांच्या घराभोवती मोठ्या प्रामाणावर गर्दी होती. पोलिसांनी प्राथमिक तपास केला असता विष पोटात गेल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर अधीक्षक मनिषा दुबुले, एलसीबीचे निरीक्षक अजय सिंदकर, ग्रामीणचे निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल होता. या प्रकारामागे आर्थिक कारण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली तरी त्याला अनेक बाजू असून पोलिसांनी विविध दिशने तपास सुरु केला आहे.

उत्तरीय तपासणीचा

अहवाल प्रतिक्षेत

पोलिसांनी दोन्ही कुटुंबातील नऊ मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मिरजेतील शासकीय महाविद्यालयात सायंकाळी उशीरा नेले. इन कॅमेरा ही उत्तरीय तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचा अहवाल रात्री उशीरापर्यंत प्राप्त झाला नव्हता. नेमके अहवालातून काय येणार याची चर्चा परिसरात सुरू होती.

नासाकडून पैसे येणार...

वनमोरे बंधु हे उच्चशिक्षीत होते. तांदळासह अन्य खाद्यपदार्थ आकर्षिक होणारी अमुक एक वस्तु दिली तर थेट नासातून हजारो कोटी रूपये दिले जातील, असे सांगणाऱ्या एका टोळीशी त्यांचा संपर्क आला होता. ती वस्तू शोधण्यासाठी त्यांनी अनेकांकडून पैसे घेतले होते. त्याचे कर्ज झाल्यानेच ही आत्महत्या झाल्याची चर्चा परिसरात सुरू होती. तो धागा पकडून पोलिस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.

अर्चनाला बोलावून घेतले

पोपट यांची कन्या अर्चना ही दीड वर्षापुर्वी स्पर्धा परिक्षेतून राष्ट्रीयकृत बँकेत नोकरीला लागली होती. कोल्हापूर येथील बँकेत ती कॅशियर म्हणून काम करत होती. ती नोकरीच्या ठिकाणी एकटी राहू नये, यासाठी आजी श्रीमती अक्काताई वनमोरे या त्याठिकाणी राहण्यास होत्या. शनिवारी, रविवार दोन दिवस सुटी असल्याने तिला आणि आजीला म्हैसाळमध्ये बोलावून घेतले होते. त्यानुसार दोघी शनिवारी सकाळी घरी आल्या होत्या. त्या दोघीही सोमवारी सकाळी परत कोल्हापूरला जाणार होत्या.

दोन्ही घरातील हातांचे ठसे घेतले

घटनेनंतर तत्काळ सांगली पोलिस दलातील फॉरेन्सीक लॅब घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी दोन्ही घरात ठसे घेतले होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in