सांगलीत महाराष्ट्र एक्स्प्रेस सहा तास रोखली, रेल्वे प्रशासनाच्या चुकीचे खापर प्रवाशांच्या माथी

शेतकऱ्यांनी या रेल्वे मार्गावर ठिय्या मांडून तब्बल सहा तास गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस रोखली. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले
सांगलीत महाराष्ट्र एक्स्प्रेस सहा तास रोखली, रेल्वे प्रशासनाच्या चुकीचे खापर प्रवाशांच्या माथी

कराड : पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरण व दुहेरीकरणासाठी संपादित जमिनींचा मोबदला व शेतीकडे जाण्यासाठी सेवा रस्ते करण्याच्या मागणीकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष करत पाठ फिरवल्याने अखेर नुकतीच त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसत वसगडे (ता. पलूस) येथील शेतकऱ्यांनी या रेल्वे मार्गावर ठिय्या मांडून तब्बल सहा तास गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस रोखली. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल तर झालेच पण या आंदोलनामुळे मिरज-पुणे रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूकही दिवसभर विस्कळीत होती. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या चुकीचे खापर रेल्वे प्रवाशांना वेठीस धरत त्यांच्या गैरसोयीवर फोडल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.

दरम्यान, वसगडेत शेतकऱ्यांच्या आंदोलनाची गंभीर दाखल घेत रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापकांनी गेल्या शुक्र.१५ रोजी पुणे येथील विभागीय कार्यालयात शेतकरी प्रतिनिधी, लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन याबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन देत बोळवण केली असली तरी आता आपल्या मागण्या केव्हा मान्य होणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. वसगडे येथे संपादित जमिनींचा मोबदला व शेतीकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यासाठी गेले वर्षभर शेतकऱ्यांचा रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र, रेल्वे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गेल्या दहा दिवसांपासून वसगडे रेल्वे गेटवर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू होते. याबाबत शेतकऱ्यांनी पाठपुरावा करूनही रेल्वेकडून प्रतिसाद न मिळाल्याने वसगडे येथील शेतकऱ्यांनी नुकतेच रेल्वे गेटवर ठिय्या मांडत दुपारी १२ वाजता मिरजेकडे जाणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस रोखल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.आंदोलकांना हटविण्यासाठी रेल्वे पोलिस सुरक्षा दल व स्थानिक पोलिस आले. मात्र, शेतकऱ्यांनी हटण्यास नकार दिल्याने रेल्वे पोलिस व स्थानिक पोलिसांचा नाइलाज झाला. तब्बल सहा तास रेल्वेमार्ग रोखल्याने महाराष्ट्र एक्स्प्रेसमधील प्रवाशांचे हाल झाले.

logo
marathi.freepressjournal.in