संजय गायकवाड यांचे विधान अंगलट; मुख्यमंत्र्यांकडून कानउघाडणी

महायुतीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून संजय गायकवाड यांची कानउघाडणी केली.
संजय गायकवाड यांचे विधान अंगलट; मुख्यमंत्र्यांकडून कानउघाडणी
@sanjaygaikwad34/ X
Published on

मुंबई : महाराष्ट्र पोलिसांएवढ अकार्यक्षम खात संपूर्ण जगात नाही, असे वादग्रस्त विधान एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केले होते. त्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले. महायुतीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून संजय गायकवाड यांची कानउघाडणी केली. त्यानंतर गायकवाड यांनी पोलिसांप्रति दिलगिरी व्यक्त केल्याने वाद शमला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबाबत केलेल्या विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. महाराष्ट्र पोलिसांएवढे अकार्यक्षम खातं फक्त भारत नव्हे तर अख्ख्या जगातही नाही. शासनाने पोलीस खात्याशी संबंधित कोणताही कायदा केला की त्यांचा एक हफ्ता वाढतो, असा आरोप त्यांनी केला होता. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गायकवाड यांना इशारा दिल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

मी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रातील संपूर्ण पोलिसांचे धैर्य खचवणे, त्यांचे साहस, धाडस आणि पराक्रम यांचा अपमान करण्याचे नव्हते. मला जे अनुभव आले होते, तेच अनुभव मी त्या ठिकाणी मांडले होते. माझ्या या शब्दांमुळे महाराष्ट्रातील पोलिसांचे किंवा महाराष्ट्र सरकारची नाचक्की होत असेल तर मी महाराष्ट्र पोलिसांची जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

वादावर शिंदेंचा पडदा

माणसांच्या चुका असतील, त्यांना दोष दिला तर काहीही अडचण नाही. गायकवाड यांनी खुलासा केला की, त्यांचा बोलण्याचा उद्देश पोलीस खात्यावर बोलण्याचा नव्हता. पोलीस हे त्याग आणि शौर्याचं प्रतीक आहे, असे म्हणत शिंदे यांनी प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

logo
marathi.freepressjournal.in