"शिंदे एलॉन मस्कचा बाप आहे का?" संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्याचा समाचार

"शिंदे एलॉन मस्कचा बाप आहे का? त्याला काय कळतं. मतदानामध्ये किती पैसे वाटले, हा विषय असेल तर मी त्याच्याशी बोलेन. टेक्निकल गोष्टींवर बोलू नका. ईव्हीएम म्हणजे ५० कोटींचं खोकं नाही. हे वेगळं खोकं आहे," असं राऊत म्हणाले.
"शिंदे एलॉन मस्कचा बाप आहे का?" संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्याचा समाचार

मुंबई: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला १७ तर महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या. या निवडणूकीतील अपयशाचं विश्लेषण करताना, विरोधकांनी फेक अजेंडा पसरवल्यामुळं राज्यात महायुतीला फटका बसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. याशिवाय उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याच्या विरोधकांच्या आरोपावर भाष्य करताना ईव्हीएम हॅक होत नाही, असंही ते म्हणाले होते. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या या वक्तव्यांचा चांगलाच समाचार घेतला. शिंदे एलॉन मस्कचा बाप आहे का? त्याला काय कळतं? अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी केली.

शिंदे एलॉन मस्कचा बाप आहे का?

एलॉन मस्क यांनी ईव्हीएम हॅक होऊ शकतं, असा दावा करणारी पोस्ट त्यांच्या एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर केली होती. याचदरम्यान एकनाथ शिंदे यांनी नुकतंच ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर राऊत यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, "शिंदे एलॉन मस्कचा बाप आहे का? त्याला काय कळतं. मतदानामध्ये किती पैसे वाटले, हा विषय असेल तर मी त्याच्याशी बोलेन. खोक्यांच्या गोष्टी तुम्ही बोला, टेक्निकल गोष्टींवर बोलू नका. ईव्हीएम म्हणजे ५० कोटींचं खोकं नाही. हे वेगळं खोकं आहे. त्याच्यामुळं देशाची लोकशाही बनते आणि बिघडते.

एकनाथ शिंदेच फेक आहेत...

विरोधकांनी लोकसभा निवडणूकीत फेक नॅरेटीव्ह सेट केलं, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते. त्यांच्या या वाक्याचाही राऊतांनी समाचार घेतला. ते म्हणाले, "एकनाथ शिंदेच फेक आहेत. ज्या राज्याचा मुख्यमंत्रीच फेक आहे, त्यांनी फेक नॅरेटीव्हची भाषा करू नये. नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षात फक्त फेक नॅरेटीव्ह सेट केली. गेल्या अडीच वर्षांपासून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस या राज्यात फेक नॅरेटिव्ह सेट करत होते, त्यांचा पराभव झाला."

मंत्रिपद का मिळालं नाही, याचं चिंतन करावं...

नारायण राणे यांच्यावरही संजय राऊतांनी टीका केली. "हे महाशय फक्त ४८ हजार मतांनी निवडून आले. पैसे वाटून...त्यांनी कशाप्रकारे पैसे वाटले, याच्या व्हिडिओ क्लिप्स आहेत. मुंबईत पेपरची लाईन टाकतात, किंवा दुध टाकतात, तशाप्रकारे घराघरात पैशांची पाकिटं टाकली जात होती. ते व्हिडिओ समोर आल्यावर या माणसानं तोंड उघडू नये. आपल्याला मंत्रिमंडळात स्थान का मिळालं नाही. यावर चिंतन करावं."

वायकरांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून रोखावं..

दरम्यान मुंबईतील उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निकालावरही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले की, "देशातील असे किती मतदारसंघात आहेत, जिथं १०० ते १००० मतांचा फरक आहे, अशा सर्व ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून निकाल आपल्या बाजूनं वळवण्याचा प्रयत्न झाला. मुंबईतील उत्तर -मध्य मतदारसंघ हा त्याचंच उदाहरण आहे. हा निकाल अत्यंत रहस्यमय आणि संशयास्पद आहे. त्यामुळं आमची मागणी आहे की रविंद्र वायकर यांना लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून रोखलं जावं.

आम्ही कोर्टात जाणार...

"आम्ही निवडणूक आयोगापासून कोर्टापर्यंत सर्व मार्ग अवलंबणार आहोत. उत्तर पश्चिममध्ये आमचाच उमेदवार विजयी झालाय आणि ते कोर्टाच्या माध्यमातून सिद्ध होईल, याविषयी आमच्या मनात शंका नाही," असंही राऊत म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in