
'धर्मवीर २' सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला. हा ट्रेलर लॉन्च होताच त्याची प्रचंड चर्चा रंगली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटावर जोरदार निशाणा साधला. हे चित्रपट वगैरे सगळं बोगस आहे, भंपक आहे. आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी अशा प्रकारचे चित्रपट आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
तर तो आनंद दिघेंचा अपमान...
संजय राऊत म्हणाले की, "आम्ही सन्मानणीय आनंद दिघे यांना अधिक चांगलं ओळखतो. आमच्या आनंद दिघेंवर हे मालकी सांगत फिरतायत. नाटकं काढतायत, सिनेमे काढतायत. पण आनंद दिघेजींच्या मनात त्यांच्याविषयी काय भावना होत्या, हे आम्हाला माहिती आहे. आम्ही त्यावर सिनेमे काढले, तर तोंड लपवून फिरावं लागेल. आज गुरुपौर्णिमा आहे. बाळासाहेबांनी सांगितलंय सत्य बोला आणि इमानानं जगा. जर बेईमान लोक आनंद दिघे यांना गुरु मानून त्यांचं खोटं चित्र उभं करत असतील, तर तो सन्माननीय आनंद दिघे यांचाही अपमान आहे आनंद दिघे यांचे गुरु शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचाही अपमान आहे. आनंद दिघेंच्या तोंडी काही वाक्य घालून तुम्ही तुमची राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न कराल. भविष्यात तुम्हीसुद्धा त्या आगीत चटके लागून संपल्याशिवाय राहणार नाही."
हे चित्रपट वगैरे सगळं बोगस...
संजय राऊत पुढे म्हणाले की, "आनंद दिघे यांचा संपूर्ण कालखंड आम्ही पाहिलाय. आनंद दिघेंच्या नावावर खोट्या गोष्टी खपवतायत. आनंद दिघे यांचं हिंदुत्व हेच बाळासाहेबांचं हिदुत्व होतं, ते काही वेगळं नव्हतं. आनंद दिघे यांनी जे हिंदुत्व स्वीकारलं, ते हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व आम्ही सर्वांनी स्वीकारलं. त्यांचं हिंदुत्व वेगळं ठाण्यात, टेंभीनाक्यावर त्यांचं हिंदुत्व वेगळं असं कधी झालं नाही. काही वेगळ्या चुली ज्या हिंदुत्त्वाच्या मांडल्यात, त्या आनंद दिघे साहेबांनी मान्य केल्या नव्हत्या. हे चित्रपट वगैरे सगळं बोगस आहे, भंपक आहे. आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी अशा प्रकारचे चित्रपट आहेत."
आपल्या बेईमानीवरती थोडे तारे चमकवायचे आहेत...
"जे खोटंच आहे, त्या खोट्याची चिंता आपण का करायची? पहिल्या चित्रपटामध्ये आदरणीय आनंद दिघे यांचा महापरिनिर्वाण दाखवला आहे. आता महापरिनिर्वाणानंतर दुसरा भाग कसा येऊ शकतो. पण विधानसभा निवडणूका आहेत. खोट्याला उजाळा द्यायचा प्रयत्न चालू आहे. आपल्या बेईमानीवरती थोडे तारे चमकवायचे आहेत. त्यामुळं आनंद दिघे यांच्यासारख्या महान, निष्ठावान शिवसेनेच्या नेत्याचा वापर करायचा," असं संजय राऊत म्हणाले.