
मुंबई : आमचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी उत्तम संवाद आहे. त्यामुळे एखाद्या विषयावर त्यांच्या केंद्रातील नेत्यांना बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसेच्या मुद्यावर सपकाळ यांची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केल्याचा दावा फेटाळून लावला.
राज्यात सध्या ठाकरे बंधूंच्या राजकीय मनोमिलनाची चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाकडून राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण त्याला हर्षवर्धन सपकाळ यांनी विरोध केल्याचा दावा केला जात आहे. यामुळे नाराज झालेल्या संजय राऊत यांनी एका पत्राद्वारे थेट दिल्लीस्थित काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केल्याचे बोलले जात होते. याप्रकरणी गुरूवारी दिवसभर वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला असताना स्वतः संजय राऊत यांनी माध्यमांपुढे येत आपली भूमिका स्पष्ट केली.
संजय राऊत म्हणाले, हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते आमचे महाविकास आघाडीतील सहकारी आहेत. तसेच आमचे उत्तम मित्र आहेत. त्यांच्याशी आमचा उत्तम संवादही आहे. त्यामुळे एखाद्या विषयावर त्यांच्या केंद्रातील नेत्यांशी बोलण्याचा प्रश्नच येत नाही. पण नक्कीच त्यांच्या पक्षाची एक भूमिका आहे. महाविकास आघाडीच्या किंवा इंडिया ब्लॉकच्या बाहेरचा एखादा पक्ष त्यांच्यासोबत शिष्टमंडळात जायचा असेल, तर त्यांना ते त्यांच्या हायकमांडला कळवावे लागते. पण आमच्याकडे तसे नाही. आमचे हायकमांड महाराष्ट्रात आहेत. ते निर्णय घेते.
हर्षवर्धन सपकाळ यांनी यासंबंधी काही चर्चा केली असेल, तर ती त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. त्यांनी ही भूमिका मांडली की, आम्हाला केंद्रात विचारावे लागेल. त्यानुसार त्यांनी केंद्रात चर्चा केली. मला वाटते, त्या दिवशी हर्षवर्धन सपकाळ यांना दुसऱ्या बैठकीला दिल्लीत जायचे होते. त्यामुळे त्यांच्या हायकमांडने बाळासाहेब थोरात यांना शिष्टमंडळात पाठवले. त्यानुसार थोरात व वर्षा गायकवाड शिष्टमंडळात सहभागी झाल्या. हा विषय एवढ्यावरच आहे. तुम्ही हे प्रकरण उगीचच रंगवत आहात, त्यात काही अर्थ नाही.
महाराष्ट्रात अत्यंत भ्रष्टाचारी मंत्री
गुजरातमध्ये मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी आपापले राजीनामे दिले, हा त्यांचा प्रश्न आहे. पण असा बदल महाराष्ट्रात होण्याची गरज आहे. महाराष्ट्रात अत्यंत भ्रष्टाचारी मंत्री बसले आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराला खतपाणी घातले जात आहे. मुख्यमंत्री अक्षरशः हतबल आहेत. अशा प्रकारचे पत्ते पिसण्याचे काम महाराष्ट्रात झाले, तर त्याचे महाराष्ट्र स्वागत करेल.