बंडखोरांविरुद्ध कारवाई व्हायला हवी! संजय राऊत यांची मागणी

महाविकास आघाडीच्या ठरलेल्या निर्णयाविरुद्ध कोणी भूमिका घेत असेल आणि त्यांना मित्रपक्षातील काही मंडळी मदत करत असतील तर त्या पक्षाने संबंधितांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करायला हवी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली.
बंडखोरांविरुद्ध कारवाई व्हायला हवी! संजय राऊत यांची मागणी

मुंबई : एका पक्षाचे काही लोक जर बंडखोरी करून महाविकास आघाडीविरुद्ध काम करीत असतील तर त्यांच्यावर त्या पक्षाने कारवाई करायला पाहिजे. महाविकास आघाडीच्या ठरलेल्या निर्णयाविरुद्ध कोणी भूमिका घेत असेल आणि त्यांना मित्रपक्षातील काही मंडळी मदत करत असतील तर त्या पक्षाने संबंधितांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करायला हवी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत हे मविआ उमेदवाराच्या प्रचारासाठी नागपूर येथे आले असता पत्रकारांशी बोलत होते. सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे, त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

सांगलीत कोणाची ताकद किती आहे आणि नाही हे जनता ठरवेल, असे सांगतानाच सांगलीत गेल्या दहा वर्षांपासून भाजपचे आमदार आणि खासदार निवडून येत आहेत. सांगलीत काँग्रेसचा बालेकिल्ला, काँग्रेसची परंपरा असताना मोक्याच्या ठिकाणी भाजपचे किंवा संघाचे लोक आमदार, खासदार म्हणून निवडून येत असतील तर त्याला त्या पक्षाची ताकद समजत नाहीत. त्यामुळे सांगलीत भाजपला टक्कर द्यायची असेल तर तेथे शिवसेनाच उभी राहायला हवी, हे आमचे धोरण आहे, असे राऊत म्हणाले.

आघाडीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात जर कोणी बंडखोरी करत असेल तर त्या विरोधात संबंधित पक्षाने कारवाई करावी, असे मत त्यांनी सांगलीच्या विशाल पाटील यांच्यासंदर्भात व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस भाजपला ४५ प्लस जागा मिळतील, असे सांगत आहेत. त्यांना आकडे लावायची सवय असेल, निवडणुकीनंतर त्यांना तेच काम करावे लागेल, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

देशभरात इंडिया आघाडी ३०५ जागा जिंकेल!

राज्यात आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढत देत आहोत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडीचाच विजय होणार आहे. देशभरात इंडिया आघाडीला ३०५ जागा मिळतील, तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३५ प्लस जागा मिळतील, असा दावा राऊत यांनी यावेळी केला.

logo
marathi.freepressjournal.in