उज्ज्वल निकम यांना जळगावातून उमेदवारी द्यायला हवी होती - संजय राऊत

महाराष्ट्रात या क्षणाला आम्ही ३० आणि ३५ जागा जिंकतोय, असा विश्वास संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.
उज्ज्वल निकम यांना जळगावातून उमेदवारी द्यायला हवी होती - संजय राऊत

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाऐवजी त्यांना जळगावातून उमेदवारी दिली पाहिजे होती, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली तरीही, उत्तर-मध्य मुंबईतून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडणूक जिंकेल, असा विश्वास संजय राऊत यांनी आज (२८ एप्रिल) पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

संजय राऊत म्हणाले, उज्ज्वल निकम हे भाजपचे उमेदवार असले तरी, महाविकास आघाडीचा उमेदवार १०० टक्के जिंकेल. माझ्या माहितीनुसार, या मदारसंघातून भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांनी उमेदवारी घेण्यास नकार दिला होता. त्या भागात कोणीही उमेदवारी घेण्यास तयार नव्हते. उज्ज्वल निकम यांनी खरे म्हणजे जळगावमधून उमेदवारी घ्यायला पाहिजे होती, असे मला वाटते. जळगाव हे त्यांचे होम ग्राउंड आहे. अर्थात तो त्यांच्या प्रश्न आहे. त्यांनी उमेदवारी स्वीकारली आहे आणि नक्कीच उत्तर-मध्य लोकसभा मदारसंघात चांगली लढत होईल, असेही संजय राऊत म्हणाले.

काही ठिकाणी महायुतीने औपचारिकता म्हणून उमेदवार दिलेत

महायुती मुंबईमध्ये अद्याप दोन ठिकाणी उमेदवारी जाहीर करू शकले नाही. दक्षिण मुंबई आणि वायव्य मुंबई जिथे आमचे आमोल किर्तीकर उभे आहेत. त्या मतदारसंघात अद्यापही महायुतीने उमेदवारी जाहीर केलेली नाही. मुख्यमंत्र्यांचा ठाणे हा कथाकथित गड तिथे देखील उमेदवारी जाहीर केलेली नाही. कल्याण-डोंबिवलीमध्ये सुद्धा अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झालेली नाही. मी त्यांना शिवसेना फडणवीस गट म्हणतो. शिवसेना फडणवीस गटाने नाशिकमध्येही उमेदवारी दिलेली नाही. तो शिंदे गट नाही, तो फडणवीस गट आहे. शिवसेना फडणवीस गट आणि ही मोदी-शहा प्रायव्हेट लिमिटेड आहे. काही ठिकाणी औपचारिकता म्हणून उमेदवारी दिली आहेत. जसे काल उत्तर-मध्य मुंबईतून सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना दिली. महाराष्ट्रात या क्षणाला आम्ही ३० आणि ३५ जागा जिंकतोय, असा विश्वास संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in