
आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यावर येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. येत्या २६ मार्चला मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेचा पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी आज मालेगाव दौरा केला. यावेळी त्यांनी आपले तुरुंगातील अनुभव सांगीतले. शिवाय, विरोधकांवर टीकादेखील केली. तसेच, ते एवढं टोकाचं का बोलतात? यावरदेखील स्पष्टीकरण दिले.
संजय राऊत म्हणाले की, "लोक म्हणतात, संजय राऊत खूप टोकाचं बोलणारा माणूस आहे. हो, मी टोकाचं बोलतो, कारण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. मी पक्षासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी तुरुंगात जाऊन आलो आहे. या ५० गद्दारांप्रमाणे गुडघे टेकले असते, तर मीही तुरुंगात जाण्यापासून वाचलो असतो. मी तुरुंगामध्ये अतोनात त्रास सहन केला असला तरीही मी काही शिवसेना सोडली नाही. आणि यापुढे कधी सोडणारही नाही. कारण असंख्य शिवसैनिकांसाठी मला आणि आपल्याला लढायचे आहे."
पुढे ते म्हणाले की, "गेले काही दिवस माझी तब्येत ठीक नव्हती, तरीही आज मालेगावमध्ये यायचेच होते. कारण, मी एखाद्याला गाडायचे ठरवले की मी त्याला गाडतोच. आज त्याची खरी सुरुवात झाली आहे. दिल्लीमध्ये एका मुलाखतीत मला एकाने सांगितले की, हे गद्दार शिवसेना भवनावर चाल करून येणार आहेत. मी त्यांना म्हटले, 'येऊ द्या, त्यांना २० फूट जमिनीच्या आतमध्ये गाडल्याशिवाय राहणार नाही. ही धमकी आहे का? तर हो ही धमकी समाज हवं तर. पण ही नुसती धमकी नाही, तर ती कृतीमध्ये उतरवण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे.”