येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला देशभरातून राजकीय, कला तसेच सांस्कृतीक क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या सोहळ्यावरुन भाजप आणि शिवसेनेत (ठाकरे गट) टीका-टिप्पणी सुरु आहे. "मला वाटतंय, आता पंतप्रधान कार्यालयही(PMO) अयोध्येमधून चालवणार, भाजपचे मुख्यालयही अयोध्येमधूनच चालवणार, हे रामाच्या नावानेच मते मागणार कारण, काम कुठे आहे? ", असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी याबाबतचे विधान केले.
भाजपकडून घरोघरी रामज्योती पेटवण्याचे आवाहन केले जात आहे, असा प्रश्न राऊत यांना विचारला असता, घरोघरी रामज्योती पेटवायला भाजपच्या आवाहनाची गरज नाही. राम या देशाची अस्मिता आणि संस्कृती आहे. डॉ. फारुक अब्दुला यांचे विधान बघा, राम पुर्ण देशाचा आहे, विश्वाचा आहे. जर एखादा पक्ष म्हणत असेल की राम आमचा आहे. तर, ते रामाला लहान करत आहेत, असे राऊत म्हणाले.
कधी पुलवामा, कधी राम. राम भक्त आम्हीही आहोत, आमच्या पेक्षा जास्त कोणी नाही. आमच्या पक्षानेही राम मंदिरासाठी आपले रक्त, त्याग, बलिदान दिले आहे. मात्र, या प्रकारचे राजकारण या देशात ना कधी झाले होते, ना कधी होईल. तीथे पीएमओ होणार, मंत्रालय होणार, येथूनच सरकार चालवले जाईल. पाच हजार वर्ष मागे जाऊन आपण देश चालवत आहोत, अशी टीका राऊत यांनी केली. ते पीएमओ ऑफिस काही दिवस अयोध्येतून चालवत आहेत, भारतीय जनता पक्षाचे मुख्यालयही अयोध्येतून चालवतील, ही चांगली गोष्ट आहे. ती त्यांची मर्जी आहे, असेही राऊत म्हणाले.
श्री राम मंदिराचा सोहळा हा या देशातील प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने आनंदाचा क्षण आहे. हा सांस्कृतिक सोहळा आहे. मात्र, भाजप त्याला राजकीय सोहळा करत आहे. प्रभू श्रीराम सर्व पाहत आहेत. हा सोहळा होऊन जाऊ द्या, मग आम्ही पाहू. आम्हाला या सोहळ्याला कोणताही गालबोट लागू द्यायचा नाही. आम्ही योग्य वेळ आली की बोलू, भूमिका मांडत राहू, असेही राऊत म्हणाले.