संजय राऊत यांना १५ दिवसांची कैद; अटकपूर्व जामीन मंजूर, वरिष्ठ न्यायालयात आव्हान देणार

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्याविरुद्ध बदनामीचा खटला दाखल केला होता.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : बदनामीच्या एका खटल्यात माझगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी गुरुवारी शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांना दोषी ठरवून १५ दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्याविरुद्ध बदनामीचा खटला दाखल केला होता.

न्यायालयाने त्यानंतर शिक्षेला ३० दिवसांची स्थगिती दिली आणि राऊत यांनी केलेल्या अर्जानुसार त्यांना जामीन मंजूर केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आरती कुलकर्णी यांनी राऊत यांना दोषी ठरविले व साध्या कारावासासह २५ हजार रुपये दंडही ठोठावला. दंडाची ही रक्कम मेधा सोमय्या यांना नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर राऊत यांच्या वकिलांनी शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणारी आणि जामीन मंजूर करण्याची विनंती करणारी अशा दोन स्वतंत्र याचिका सादर केल्या, त्या न्यायालयाने मंजूर केल्या. राऊत यांनी किरीट सोमय्या आणि आपल्याविरुद्ध निराधार आणि बदनामी करणारे आरोप केले, अशी तक्रार मेधा सोमय्या यांनी ॲड. विवेकानंद गुप्ता यांच्यामार्फत केली होती. मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात सार्वजनिक शौचालये बांधणे आणि त्यांची देखभाल करण्याच्या कामात सोमय्या दाम्पत्याने १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांनी केला होता.

आरोपीने माध्यमांकडे जे वक्तव्य केले ते बदनामीकारक असून सर्वसामान्य जनतेच्या मनात आपली प्रतिमा मलिन करणारे आहे, असे तक्रारीमध्ये म्हटले आहे.

२५ हजारांच्या बॉन्डवर जामीन

न्यायालयाने खा. राऊत यांनी दोषी ठरवून शिक्षा ठोठावल्यानंतर अ‍ॅड. मनोज पिंगळे यांनी या निर्णयाविरोधात अपील दाखल करण्यासाठी शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती केली. न्यायदंडाधिकारी कुलकर्णी यांनी ही विनंती लगेचच मान्य केली आणि अपील दाखल करण्यास मुदत देत शिक्षेला एक महिन्याची स्थगिती दिली व राऊत यांना १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

कोर्टाचे निरीक्षण

शौचालयाच्या सार्वजनिक सुविधेसंबंधी वृत्त आणि विधानांमध्ये लोकांच्या हिताचा मुद्दा दिसून येत आहे. प्रतिवादी संजय राऊत यांनी कुठेही वैयक्तिक आरोप केल्याचे निदर्शनास येत नाही. केवळ तक्रारदाराला मानसिक वेदना झाल्याच्या मुद्द्यावर संजय राऊत यांना दोषी ठरवले जात असल्याचे मत न्यायदंडाधिकारी न्यायालयाने व्यक्त केले.

ठाकरे सरकारच्या दबावामुळे तक्रार घेतली नाही - सोमय्या

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या दबावामुळे खा. संजय राऊत यांच्याविरुद्ध आपल्या पत्नीने केलेली तक्रार नोंदविण्यास पोलिसांनी नकार दिला, असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी येथे केला. आपली तक्रार नोंदवून घेण्यासाठी आम्हाला न्यायालयात जावे लागले आणि २८ महिन्यांनंतर आम्हाला न्याय मिळाला, असे किरीट सोमय्या यांनी वार्ताहरांना सांगितले.

मेधा सोमय्या या युवक प्रतिष्ठान ही स्वयंसेवी संस्था चालवितात आणि शौचालयांच्या बांधकामाबाबत ही संस्था सल्लागार म्हणून काम करते. यासाठीची मूळ निविदा ३.६१ कोटी रुपयांची होती, असे किरीट सोमय्या म्हणाले. आम्ही राऊत यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला, मात्र उद्धव ठाकरे यांच्या दबावामुळे तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही.

हे अपेक्षितच - राऊत

पंतप्रधान गणपतीचे मोदक खायला सरन्यायाधीशांकडे जातात. मग भ्रष्टाचाऱ्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या आमच्यासारख्या लोकांना न्याय कसा मिळेल? हे अपेक्षितच होते. मीरा-भाईंदर येथील शौचालयाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आपण केला नव्हता. मीरा-भाईंदर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी हा दावा केला होता. तसेच, मीरा-भाईंदरचे आमदार प्रताप सरनाईक यांनी या भ्रष्टाचाराविरोधात चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले होते. याविरोधात विधानसभेतही चर्चा झाली होती. विधानसभेतील चर्चेनंतर एक आदेशही पारित करण्यात आला होता. मी फक्त यावर प्रश्न विचारले होते, असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले आहे.

logo
marathi.freepressjournal.in