संजय राऊतांनी अकलेचे तारे तोडले! गडकरींसंदर्भातील वक्तव्यावरून बावनकुळे संतप्त

नागपुरात नितीन गडकरींच्या पराभवासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
संजय राऊतांनी अकलेचे तारे तोडले! गडकरींसंदर्भातील वक्तव्यावरून बावनकुळे संतप्त
PTI

नागपूर : नागपुरात नितीन गडकरींच्या पराभवासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, ‘संजय राऊत यांनी रोखठोकमधून अकलेचे तारे तोडले असून ते भ्रमिष्ट अवस्थेत ‘रोखठोक’ लिहित असावेत’, अशी टीका केली आहे.

बावनकुळे पुढे म्हणाले की, २०१९ मध्ये राऊत यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर एक रोखठोक त्यावरही येऊ द्या. आयुष्यभर राऊत यांनी गटातटाचे राजकारण केले त्यांना परिवार काय कळणार?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे की, संजय राऊत यांनी आज पुन्हा अकलेचे तारे तोडत भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केले आहे. राऊत हे उद्धव ठाकरे यांचे कर्मचारी आहेत, पण ते शरद पवार यांची चाकरी करतात. ते भ्रमिष्ट अवस्थेत ‘रोखठोक’ लिहित असावेत. भाजप हा पक्ष नाही तर परिवार आहे. ज्यांनी आयुष्यभर गटातटाचे राजकारण केले त्या संजय राऊत यांना परिवार काय कळणार?

बावनकुळे यांनी पुढे म्हटले आहे की, ‘मोदीजी, अमित भाई, योगीजी, नितीनजी, देवेंद्रजी हे भाजपच्या एकाच परिवारातील सदस्य आहेत. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हे मूल्य घेऊन भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता काम करतो. पण, संजय राऊत यांच्या बाबतीत प्रथम शरद पवार, नंतर स्वतः आणि शेवटी उद्धव ठाकरे आणि उबाठा गट असा क्रम आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यातून असेच काहीतरी बाहेर पडणार’.

आरोप निराधार - मुनगंटीवार

रोज उठायचे आणि खोटे बोलायचे, असे राऊत यांचे सुरू आहे. त्यांचे आरोप निराधार असून त्यांनी केलल्या आरोपात काहीही तथ्य नाही, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

गडकरींच्या पराभवासाठी मोदी, शहा, फडणवीसांचे प्रयत्न - राऊत

नागपुरात नितीन गडकरींचा पराभव व्हावा यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केले. मात्र, जेव्हा गडकरींचा पराभव होणार नाही हे कळले, तेव्हा नाइलाज म्हणून फडणवीस हे प्रचारासाठी उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद ही फडणवीसांनी पुरवल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच ४ जूननंतर भाजपमध्ये मोदी-शहा यांना पाठिंबा राहणार नाही, असाही दावा त्यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in