भावाला नोटीस, संजय राऊत संतापले; म्हणाले- “महाराष्ट्रात फडणवीसांचं राज्य आहे की अफझल खान आणि…”

मला माहिती आहे संदीप राऊतांचं हॉटेल आहे. त्यावेळी खिचडीसाठी त्यांचं हॉटेल वापरण्यात आलं आणि माझ्या मुलीनं त्यांना मदत केली, याविषयीची नोटीस पाठवली आहे. हे हास्यास्पद असून हा निव्वळ मूर्खपणा आहे.
sanjay raut
sanjay rautANI
Published on

कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी सक्तवसूली संचालनालयाने शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना नोटीस बजावल्यानंतर संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. राज्यामध्ये मोगलाई चालू आहे का ? महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं राज्य आहे की अफजलखान, शाहिस्तेखानाचं राज्य आहे, का निजामशाही आली आहे ? असा सवाल विचारत त्यांनी केंद्रासह राज्यसरकावर हल्लाबोल केला. आज सकाळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ईडीने संदीप राऊत यांना चौकशीचे समन्स बजावले आहे. या समन्सनुसार संदीप राऊत यांना पुढच्या आठवड्यात चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे संदीप राऊत यांची याआधी मुंबई गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर आता ईडीकडून त्यांची चौकशी केली जाणार आहे.

याबाबत बोलताना, विरोधी पक्षातल्या नेत्यांना नोटीस देण्याचं भाजपाचं तंत्र आहे. मला माहिती आहे संदीप राऊतांचं हॉटेल आहे. त्यावेळी खिचडीसाठी त्यांचं हॉटेल वापरण्यात आलं आणि माझ्या मुलीनं त्यांना मदत केली, याविषयीची नोटीस पाठवली आहे. हे हास्यास्पद असून हा निव्वळ मूर्खपणा आहे. तुम्हाला काय कराचंय ते करा, आम्ही गुडघे टेकणारे नाहीत. दोन-पाच लाखाच्या नोटीशी पाठवतात, तुम्ही काय चिंचोके खाता का? असा टोला राऊतांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. "तुमच्या घरातले लोक लंडनमध्ये किती दिवस राहतात. लंडनमधला व्हिला, प्रवास खर्च याचे प्रायोजक कोण आहेत? मात्र आम्ही कुटुंबापर्यंत जाणार नाही. आमच्यावर बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, शरद पवार, उद्धव ठाकरे यांचे संस्कार आहेत. तुमची लढाई आमच्याशी आहे ना तर आमच्याशी लढून दाखवा. हे नामर्द लोक आहेत. आमचं घर डरपोक लोकांचं घर नाही. शिवसेना आमच्या रक्तात आहे", असं संजय राऊत म्हणाले. "रोहित पवार यांनाही नोटीस बजावली. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना नोटीस बजावता. जे डरपोक होते ते तुमच्या कळपात शिरले. या लोकांना लाज वाटली पाहिजे. विक्रांत बचावसाठी क्राऊड फंडिंगच्या नावाखाली ३८ कोटी मुलुंडच्या पोपटलालने गोळा केले. साकेत गोखले हे तृणमूलचे खासदार आहेत त्यांना ५०० रुपये क्राऊड फंडिंगसाठी अटक झाली, पण ३८ कोटी कुठे गेले? त्याची तक्रार कुठे गेली, ती विरून गेली", असा आरोपही त्यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in