

नवी दिल्ली : बारामती येथे २८ जानेवारी झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. त्यानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात असून अजित पवार यांच्या पक्षाचे नेतेच या अपघातावर आता शंका उपस्थित करत आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या विमान अपघाताचे रहस्य वाढले आहे. यावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. ‘अजितदादांनी भाजपच्या घोटाळ्याची फाईल आपल्याकडे असल्याचे १५ जानेवारीला म्हटले अन् पुढच्या १० दिवसांत विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. हे प्रकरण रहस्यमय असून मला जस्टिस लोया यांची आठवण येत आहे’, असे राऊत म्हणाले.
अपघाताबाबत लोकांच्या मनात शंका आहे...
संजय राऊत म्हणाले की, अजित पवार यांच्या अपघाताचे प्रकरण साधे नाही. अजित पवार यांनी स्वगृही जाणे हा भाजपचा पराभव आहे. देशातील राजकारणाला कलाटणी देणारा तो निर्णय ठरला असता आणि भाजपची जी दहशत आहे ती मोडून गेली असती. अजित पवार वारंवार सांगत होते माझ्याकडे भाजपच्या घोटाळ्याची फाईल आहे आणि मी उघड करेन. १५ जानेवारीला त्यांनी हे सांगितले आणि पुढच्या १० दिवसात त्यांच्या विमानाचा अपघात होऊन, त्यांचा मृत्यू झाला. हे रहस्यमय आहे. या प्रकरणानंतर मला जस्टिस लोया यांची आठवण होत आहे. मी कुणावर आरोप करत नाही, पण याबाबत लोकांच्या मनात शंका आहे.
आ. मिटकरींनीही उपस्थित केलेत काही प्रश्न
अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. ते गंभीर स्वरूपाचे प्रश्न आहेत. त्यांनी ज्या शंका उपस्थित केल्या, जे काही प्रश्न निर्माण केले ते पाहून मलाही वाटले हा गंभीर विषय आहे.अजित पवार यांच्यासारखा नेता विमानात बसतो. त्यांच्यासोबत कुणीही प्रमुख व्यक्ती नाही, ओएसडी नाही. विमानाच्या मेंटेनन्सचे सर्टिफिकेट नाही. त्याच्यामुळे लोकांच्या मनात शंका येणारच, असेही संजय राऊत म्हणाले.
त्याच दिवशी शंकेची पाल चुकचुकली...
ते पुढे म्हणाले की, ‘माझ्या मनातही त्याच दिवशी शंकेची पाल चुकचुकली. ज्या दिवशी अजित पवारांनी सांगितले की, भाजपच्या घोटाळ्याची फाइल माझ्याकडे आहे आणि योग्यवेळी उघड करेन. तेव्हाच माझ्या मनात शंका आली. याचा अर्थ असा होता की, अजित पवारांनी भाजप सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. सरकारमधील उपमुख्यमंत्री उघडपणे सांगतो की, यांच्या घोटाळ्याची फाइल माझ्याकडे आहे. तर १९९५ च्या काळात सिंचन प्रकल्पाचे बजेट वाढवून यांनी काही कोटी पक्ष निधीकडे कसे वळवले हे जेव्हा अजित पवार सांगत होते तेव्हा मी त्यांची बॉडी लँग्वेज बघत होतो. मला स्पष्ट दिसत होते की, अजितदादांना पुन्हा शरद पवारांसोबत जायचे आहे’.
पवारांनी केलेले वक्तव्य ही तेव्हाची गरज होती...
शरद पवार प्रगल्भ नेतृत्व असून कोणत्या वेळी काय बोलावे आणि निर्णय घ्यावा हे त्यांना पक्के कळते. मुंबईच्या बॉम्बस्फोटावेळीही त्यांनी १३ बॉम्बस्फोट झाले असताना १४ झाले असे सांगितले. याचे काही कारण होते. त्याच्यामुळे पवारांनी अपघाताबाबत केलेले वक्तव्य तेव्हाची गरज होती. पण त्या संदर्भात अजित पवार यांच्या पक्षाचे लोक संशय आणि शंका घ्यायला लागलेले आहेत. जर तुम्ही म्हणता ६ पॅसेंजर होते आणि ५ मृतदेह मिळताहेत, मग ती सहावी व्यक्ती कोण? तिची बॉडी का मिळाली नाही? सगळे देह आतले जळून खाक झाले. ओळख पटवता येत नव्हती. अशावेळेला दादांच्या जवळच्या सगळ्या फाईल्सचे कागद जळालेले नाही. ते तसेच पडलेले आहेत. त्यामुळे दादांबरोबर भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का? ती फाईल मुंबईतून बारामतीत सुरक्षित ठेवायला घेऊन चालेल होते का? असे अनेक प्रश्न आहेत. मी राज्यसभेत हा प्रश्न उपस्थित करणार आहे, असे संजय राऊत म्हणाले.