खासदार संजय राऊतांना 'ते' ट्विट भोवणार, बार्शीत गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली, मात्र, त्या ट्विटमुळे त्यांच्यावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला
खासदार संजय राऊतांना 'ते' ट्विट भोवणार, बार्शीत गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Published on

आज सोलापूरमधील बार्शीमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका प्रकरणामध्ये त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पीडित मुलीचा फोटो ट्विट केला होता. अल्पवयीन अत्याचार पीडित मुलीची ओळख जाहीर केल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे. यामुळे आता त्यांच्या समोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण, त्यांच्यावर या प्रकरणी 'पॉक्सो कलम २३','ज्युवेनाईल जस्टिस अॅक्ट कलम ७४' आणि 'आयपीएस २२८ अ' या नुसार बार्शी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.

५ मार्च रोजी सोलापूरच्या बार्शीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. तसेच, त्याच्याच दुसऱ्या दिवशी २ आरोपींनी तिच्या घरात घुसून तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पीडित मुलगी ही गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्या २ आरोपीना अटक केली होती. मात्र या प्रकरणावरून ट्वीट करताना संजय राऊतांनी आरोपी मोकाट असल्याचे सांगितले. या ट्विटमध्ये त्यांनी पीडित मुलीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला फोटो देखील शेअर केला होता. यावरून आता त्यांच्यावर अल्पवयीन अत्याचार पीडित मुलीची ओळख जाहीर केल्याची तक्रार बार्शी पोलिसांकडे केली. त्यानंतर संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, भाजपच्या चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर टीका करत खोटी माहिती देत असल्याची टीकादेखील केली.

logo
marathi.freepressjournal.in