Operation Tiger : जनता रस्त्यावर फिरू देणार नाही; संजय राऊतांचा 'फुटीरां'ना इशारा

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या ‘ऑपरेशन टायगर’वर अखेर ठाकरेंच्या शिवसेना पक्षाने बुधवारी पत्रकार परिषद घेऊन आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली. अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय राऊत यांनी एकत्र येत बंडखोरी करणाऱ्यांना थेट इशाराच दिला आहे.
Operation Tiger : जनता रस्त्यावर फिरू देणार नाही; संजय राऊतांचा 'फुटीरां'ना इशारा
Operation Tiger : जनता रस्त्यावर फिरू देणार नाही; संजय राऊतांचा 'फुटीरां'ना इशारा
Published on

मुंबई : ‘उद्धव ठाकरेंच्या खासदारांना प्रत्येकी ५० कोटी रुपयांना विकत घेतले जात असून, मंगळवारी रात्रीच १५ कोटींचा ॲडव्हान्स दिला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर तर पवनराजे हत्याकांडाचा निकाल बाजूने हवा असेल, तर आमच्यासोबत या, असा दबाव टाकला जात आहे’, असा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला. ठाकरेंचे ६ खासदार फुटणार या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच, राऊत यांच्या या विधानाने मोठा गौप्यस्फोट झाला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या ‘ऑपरेशन टायगर’वर अखेर ठाकरेंच्या शिवसेना पक्षाने बुधवारी पत्रकार परिषद घेऊन आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली. अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय राऊत यांनी एकत्र येत बंडखोरी करणाऱ्यांना थेट इशाराच दिला आहे. ‘हा लोकशाहीचा केलेला तमाशा असून आता पुन्हा जर कोणी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्रातील जनता आणि शिवसैनिक गप्प बसणार नाहीत, रस्त्यावर फिरू देणार नाहीत’, असे या नेत्यांनी ठणकावून सांगितले.   

खासदारकीचा राजीनामा देऊनच जावे...

एका विश्वासू सूत्राने मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही माहिती दिल्याचा दावा राऊत यांनी यावेळी केला. हे सर्व खासदार ‘मशाल’ या चिन्हावर आणि उद्धव ठाकरेंच्या मेहनतीवर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना बेईमानी करण्याचा कोणताही अधिकार नाही, असे नमूद करत ज्यांना जायचे असेल त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन मगच जावे, असे आव्हान राऊत यांनी दिले. या राजकीय घडामोडींना पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड खटल्याच्या निकालाची पार्श्वभूमी आहे. सन २००६ मधील या बहुचर्चित प्रकरणाचा अंतिम निकाल १६ जून रोजी लागण्याची शक्यता होती; मात्र मुंबई सत्र न्यायालयाने अंतिम निकालासाठी आणखी काही दिवसांचा अवधी घेत पुढील सुनावणी २० जून रोजी निश्चित केली आहे. या निकालापूर्वीच खासदारांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे.

महाराष्ट्र हा तमाशा सहन करणार नाही...

पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संजय राऊत अत्यंत संतापलेले दिसले. लाखो प्रामाणिक शिवसैनिकांनी दिवस-रात्र एक करून, स्वतःचे रक्त आटवून यांना निवडून दिले आहे, त्यामुळे हा तमाशा महाराष्ट्र सहन करणार नाही, असे ते पुढे म्हणाले. दोन दिवसांपूर्वी ‘मातोश्री’वर झालेल्या खासदारांच्या बैठकीचा अंतर्गत किस्सा उघड करताना त्यांनी सांगितले की, १४ जून रोजी झालेल्या बैठकीत सर्व खासदार प्रत्यक्ष आणि ऑनलाईन उपस्थित होते. त्या बैठकीत एका खासदाराने ५ वेळा साईबाबांची, दुसऱ्याने आई भवानीची तर एकाने स्वतःच्या पोटच्या मुलांची शपथ घेतली होती. बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगणारे हे खासदार जर आता ५० कोटी रुपयांच्या डीलसाठी विकले जात असतील, तर यांना जनता रस्त्यावर फिरू देणार नाही, असा जळजळीत इशारा त्यांनी दिला.

ठाकरे गटातर्फे व्हीप जारी

नवी दिल्ली : खासदार अरविंद सावंत यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीत बोलताना सावंत म्हणाले की, संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठी मी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. आतापर्यंत आमच्या पक्षातील एकाही खासदाराने किंवा नेत्याने पक्ष सोडत असल्याचे आम्हाला सांगितलेले नाही. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या खासदारांच्या फुटीच्या चर्चांवर सावंत यांनी थेट भाष्य करत, पक्षातील कुणीही अधिकृतपणे जाण्याची भूमिका मांडलेली नसल्याचे स्पष्ट केले. पक्षाने या सर्व कायदेशीर बाबी लक्षात घेऊन तातडीने सर्व खासदारांसाठी अधिकृत व्हीप जारी केला असून, दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही पक्षाच्या वतीने अधिकृत पत्र पाठवण्यात आले आहे. खासदार अरविंद सावंत यांनीही याला दुजोरा दिला असून, संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिल्याची माहिती त्यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in