संत गजानन महाराज यांची पालखी सोलापुरात दाखल

कपाळी केशरी गंध, खांद्यावर भगवी पताका, हातात टाळ, मृदंग आणि मुखी श्री गजाननाचा अखंड जयघोष करीत आषाढी यात्रेसाठी शेगावातून पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी निधालेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळयाचे शनिवारी सायंकाळी धाराशिव आणि सोलापुर जिल्ह्याच्या सीमेवर स्वागत केले.
संत गजानन महाराज यांची पालखी सोलापुरात दाखल
Published on

सूर्यकांत आसथे/सोलापूर : कपाळी केशरी गंध, खांद्यावर भगवी पताका, हातात टाळ, मृदंग आणि मुखी श्री गजाननाचा अखंड जयघोष करीत आषाढी यात्रेसाठी शेगावातून पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी निधालेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळयाचे शनिवारी सायंकाळी धाराशिव आणि सोलापुर जिल्ह्याच्या सीमेवर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक प्रीतम यावलकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी स्वागत केले.

गण..गण.. गणात बोतेच्या अखंड जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. टाळ मृदंगाच्या गजराने आसमंत दुमदुमून गेला होता. शनिवारचा उळे नावातील मुक्काम आटोपून श्री संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा रविवारी सकाळी सोलापूर शहरात प्रवेश करणार आहे

रूपाभवानी चौकातील पाणी गिरणी येथे परंपरेप्रमाणे सोलापुर महानगरपालिकेच्या वतीने स्वागत केल्यानंतर पालखी सोहळा दुपारी श्री प्रभाकर महाराजांच्या भेटीसाठी जाईल. त्यानंतर सायंकाळी कुचन प्रशालेत मुक्काम होणार आहे. श्री गजानन महाराजांच्या दिंडीसोबत योगी आणि स्वामी हे दोन मानाचे अश्व अग्रभागी आहेत.

५६ वर्षांची अखंड परंपरा

संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याला ५६ वर्षांची अखंड परंपरा आहे. शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्यात एकूण ७०० वारकऱ्यांचा समावेश असतो. शेगाव ते पंढरपूर असे ७५० किलोमीटर अंतर पार करत आणि ३३ ठिकाणी मुक्काम करत गजानन महाराजांचा पालखी सोहळा आषाढीच्या पूर्वी पंढरपुरात पोहोचतो. अनेक वर्षांची परंपरा आजही कायम आहे.

भगवी पताका अखंड खांद्यावरच!

गजानन महाराजांच्या दिंडी सोहळ्यातील सेवेकऱ्यांनी संपूर्ण वारी मार्गावर फक्त आणि फक्त हरिनामाचा गजर करण्याचा वर्षानुवर्ष दंडक आहे. वारकरी पताका घेतलेल्या सेवेकऱ्यांकडून भगवी पताका जमिनीला लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्याचा नियम चालून देण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in