आरती, महापूजा, हरिपाठासह टाळ, मृदंगाने देहूनगरी दुमदुमली; भक्तिमय वातावरणात संत तुकाराम बीज सोहळा साजरा

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नामगजराने गुरुवारी देहूनगरी दुमदुमली. भजनी दिंड्यांनी रात्रभर केलेला जागर, काकडा आरती, महापूजा, हरिपाठ अन् वीणा, टाळ, मृदंग, चिपळ्यांची साथ, हरिनामाचा गजर आणि भाविकांची अलोट गर्दी अशा भक्तिमय वातावरणात ३७८ वा बीज सोहळा संपन्न झाला.
आरती, महापूजा, हरिपाठासह टाळ, मृदंगाने देहूनगरी दुमदुमली; भक्तिमय वातावरणात संत तुकाराम बीज सोहळा साजरा
Published on

पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नामगजराने गुरुवारी देहूनगरी दुमदुमली. भजनी दिंड्यांनी रात्रभर केलेला जागर, काकडा आरती, महापूजा, हरिपाठ अन् वीणा, टाळ, मृदंग, चिपळ्यांची साथ, हरिनामाचा गजर आणि भाविकांची अलोट गर्दी अशा भक्तिमय वातावरणात ३७८ वा बीज सोहळा संपन्न झाला.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे आजच्या दिवशी सदेह वैकुंठगमन झाले. त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. देहूनगरीत या दिव्य सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी दाखल झाले होते. पहाटे तीन वाजता मुख्य देऊळवाड्यात काकडाआरती झाली. पहाटे चार वाजता देऊळवाड्यातील विठ्ठल-रुक्मिणी पूजा, संत तुकाराम महाराज शिळा मंदिरातील महापूजा संस्थानाचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे आणि विश्वस्तांच्या हस्ते झाल्या. सकाळी सहा वाजता वैकुंठगमन स्थान येथील पूजा झाली. विश्वस्त लक्ष्मण महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, दिलीप महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, विक्रमसिंह महाराज मोरे यावेळी उपस्थित होते.

सकाळी साडेदहा वाजता हरीनामच्या गजरात पालखीचे वैकुंठस्थान मंदिराकडे प्रस्थान झाले. त्यानंतर वैकुंठगमन सोहळ्यात देहूकर महाराजांचे वैकुंठगमन प्रसंगावर कीर्तन झाले. साडे अकरा वाजता पालखीची वैकुंठगमन मंदिराला प्रदक्षिणा झाली. दुपारी बारापर्यंत तुकोबारायांच्या नामाचा, विठ्ठलाच्या नामाचा गजर झाला. बारा वाजता नांदुरकीच्या वृक्षावर फुलांची उधळण करून, मनो भावे हात जोडत भाविकांनी इंद्रायणीच्या काठी भक्तिचैतन्य फुलवले. दुपारी साडेबारा वाजता वैकुंठस्थान येथून पालखीचे मुख्य देऊळवाड्यातील मंदिराकडे आगमन झाले. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती.

इंद्रायणीकाठी भाविकांचा जनसागर

वडिवळे धरणातून इंद्रायणी नदीत विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे ती दुथडी भरून वाहत आहे. हजारो भाविकांनी मुख्य देऊळवाड्यात दर्शनासाठी जाण्यापूर्वी इंद्रायणी नदीत स्नान केले. त्यानंतर भाविकांनी दर्शनबारीतून विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात दर्शन घेतले. मुख्य देऊळवाड्यात आणि वैकुंठस्थान मंदिरात पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

logo
marathi.freepressjournal.in