
पुणे : ‘संपदा सोहळा नावडे मनाला। लागला टकळा। पंढरीचा।। असा भाव...टाळ मृदंगाचा अखंड गजर....ज्ञानोबा-तुकोबा नामाचा जयघोष...अन् विठुरायाच्या भेटीची आस...’ अशा भक्तिमय वातावरणात लाखो वैष्णवांच्या साक्षीने संत तुकाराम महाराजांच्या पालखीने बुधवारी दुपारी देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पालखीची विधिवत प्रस्थान पूजा आणि आरती संपन्न झाली.
संत तुकाराम महाराजांच्या ३४० व्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी देहूत भक्तीचा महापूरच लोटला होता. प्रस्थानाचा हा सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील लाखो भाविक इंद्रायणीकाठी एकवटले होते. बुधवारी भल्या पहाटे घंटानाद झाला व पहाटे साडेचार वाजता काकड आरती झाली. पाच वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संस्थानच्यावतीने महापूजा झाली, तर साडेपाच वाजता संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे, विश्वस्त विक्रमसिंह महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा झाली. त्यानंतर वैकुंठस्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरातील पूजाविधी पार पडले.
दुपारी दोनच्या सुमारास इनामदारवाड्यातून संत तुकाराम महाराजांच्या पादुका मुख्य देऊळवाड्यात आणण्यात आल्या. त्यानंतर पालखी प्रस्थान सोहळ्य़ास दुपारी अडीच वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. अकलूज येथील मोहिते-पाटील व बाभूळगावकर यांच्या अश्वांनी महाद्वारातून प्रवेश करताच भाविकांचे हात जोडले गेले. मानाच्या दिंड्या देऊळवाड्यात पोहोचताच सोहळ्य़ातील वातावरण भारून गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तसेच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीरंग बारणे, राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, सुनील शेळके, उमा खापरे यांच्या उपस्थितीत पादुकांची पूजा करण्यात आली.
फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये पादुका ठेवण्यात आल्या. चारच्या सुमारास पालखी खांद्यावर उचलून भजनी मंडपातून बाहेर आणताच वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले. टाळ-मृदंगाचा स्वर टिपेला पोहोचला. वारकरी फुगड्यात दंगले. सारा आसमंतच या सोहळ्य़ात रंगून गेला. मंदिर प्रदक्षिणेनंतर पालखी सोहळा सायंकाळी इनामदार वाड्यात मुक्कामी पोहोचला. त्या ठिकाणी समाजआरती झाली. रात्रभर अवघी देहुनगरी भजन, कीर्तनात रंगली.
पालखीचा आज आकुर्डीत मुक्काम
संत तुकाराम महाराजांची पालखी गुरुवारी इनामदारवाड्यातून आकुर्डीकडे मार्गस्थ होईल. पहिला विसावा अनगडशाह बाबा दर्गा येथे असेल. तेथे अभंग, आरती होईल. तसेच चिंचोली पादुका येथे अभंग, आरती होईल. निगडीत दुपारी भोजन करून पालखी सोहळा रात्री आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्काम करणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भागवत धर्म आणि वारकरी संप्रदायाने शेकडो वर्षे आक्रमणातूनही आपला देव, देश आणि संस्कृतीचे रक्षण केलेले आहे, आपल्या भागवत धर्माचे रक्षण केलेले आहे.
प्रस्थान सोहळ्यादरम्यान काही दिंड्यांना थांबवण्यात आले होते, यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी पोलिसांच्या उत्तम व्यवस्थेचे कौतुक केले. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, एका वेळी सगळ्यांना सोडलं तर या ठिकाणी चेंगराचेंगरी होईल. त्यामुळे आपल्याला थोड्या-थोड्या भाविकांना सोडावे लागेल.