कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजेरी

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमधील खंडणीप्रकरणी अटकेत असलेला आणि ‘मकोका’अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आरोपी वाल्मिक कराड याला बुधवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
वाल्मिक कराड
वाल्मिक कराडPC : (X) @DharmendraAnam1
Published on

बीड : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमधील खंडणीप्रकरणी अटकेत असलेला आणि ‘मकोका’अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आरोपी वाल्मिक कराड याला बुधवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कराड याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीडमधील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि खंडणी प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाल्याची माहिती सीआयडीने न्यायालयात दिली. त्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. वाल्मिक कराड याच्यावर ‘मकोका’अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याप्रकरणी बुधवारी न्यायालयात सुनावणी झाली. आता कराड याच्याकडून जामिनासाठी प्रयत्न होणार का, हे पाहावे लागणार आहे. मात्र, ‘मकोका’ लागल्याने वाल्मिक कराडला तूर्तास जामीन मिळणे अवघड असल्याचे मानले जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटले. त्यानंतर काही दिवसांतच एक मारेकरी सोडून इतरांना अटक करण्यात आली. मात्र, वाल्मिक कराड हाती येत नव्हता. वाल्मिक कराड ३१ डिसेंबरला पुणे पोलिसांना शरण आला. त्यानंतर त्याचा ताबा सीआयडीने घेतला. त्याला बीडला नेण्यात आले होते. दरम्यान, वाल्मिक कराड शरण आला यावरुनही विरोधकांनी सरकारवर टीका केली होती.

कृष्णा आंधळे फरार घोषित

सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे याला बुधवारी फरार घोषित करण्यात आले. आंधळे याच्याबद्दलची माहिती देणाऱ्याला योग्य इनाम दिले जाईल, अशी घोषणाही पोलिसांच्यावतीने करण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि आंधळे यांच्याबाबत माहिती देणाऱ्यांसाठी यापूर्वीही इनाम देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, घुले आणि सांगळे यांना अटक करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in