
केज : सरपंच संतोष देशमुख हत्येतील खंडणीप्रकरणी अटक करण्यात आलेला आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वासू साथीदार अशी ओळख असलेला वाल्मिक कराड याच्यावर अखेर ‘मकोका’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवारी येथील न्यायालयाने कराडची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. ‘मकोका’ लावल्यानंतर कराडला एसआयटीच्या ताब्यात देण्यात आले आहे. ‘मकोका’ लावल्याने आता सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी कराडची चौकशी केली जाऊ शकते.
पवनचक्की कंपनी खंडणी प्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराडची १५ दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकारी वकील आणि कराडच्या वकिलांचा युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कराडवर ‘मकोका’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सीआयडीकडून सांगण्यात आले. तसा अर्जही सीआयडीकडून कोर्टाकडे करण्यात आला आहे. ‘मकोका’ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवल्याने सीआयडीकडून पुन्हा कराडची कोठडी मागितली जाऊ शकते.
सरपंच हत्या प्रकरणातील आठ आरोपींवर ‘मकोका’ कायद्यांतर्गत यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यावेळी कराड याच्यावर या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत वाल्मिक कराड हाच गुन्ह्याचा सूत्रधार असून त्याच्यावर ‘मकोका’ कायद्यासह हत्येच्या प्रकरणातही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता सीआयडीकडून कराडवर ‘मकोका’ लावण्यात आला आहे.
सुनावणीच्या वेळी सीआयडीने कराडची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. सुनावणीवेळी सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद झाला. आम्हाला वाल्मिक कराडचा हत्येतील सहभाग तपासायचा आहे. त्यामुळे त्याला १० दिवसांची सीआयडी कोठडी द्यावी. वाल्मिक कराड याच्या आवाजाचे नमुने तपास अधिकाऱ्यांनी घेतले आहेत. देशाबाहेर आणि देशात मालमत्ता जमवली आहे का, याचा तपास करायचा आहे. ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात तपास करायचा आहे. त्यामुळे दहा दिवसांची कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.
आरोपीचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनीही युक्तिवाद केला. सीआयडी कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्यावी. सगळा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. संपत्तीची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडी का, १५ दिवसांत यांनी काय तपासले. घुले, कराड दोन्ही कोठडीत असताना समोरासमोर चौकशी का केली नाही, असा सवाल न्यायालयात उपस्थित केला. यावेळी न्यायालयाने सरकारी वकिलांची मागणी फेटाळून लावत वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली.
संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप वाल्मिक कराडवर ठेवण्यात आल्याचे एसआयटीने म्हटले आहे. या हत्येच्या तपासासाठी एसआयटी वाल्मिक कराडचा ताबा मागणार आहे, तर सीआयडीसुद्धा चौकशीसाठी न्यायालयात कराडचा ताबा मागू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, वाल्मिक कराडला ‘मकोका’ लावल्यानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली की, आमचा मुख्यमंत्री आणि पोलिसांवर विश्वास आहे.
समर्थकांची दगडफेक, टायर जाळले
वाल्मिक कराडवर ‘मकोका’अंतर्गत कारवाई झाल्याचे वृत्त येताच ‘परळी शहर बंद’ची हाक देण्यात आली. टॉवरवर चढून आंदोलकांनी तीव्र निषेध नोंदवला. वाल्मिक कराड हे दोषी नाहीत, असे म्हणत त्याचे समर्थक आक्रमक झाले. शहरात काही ठिकाणी बसवर दगडफेक करून टायर जाळण्यात आले. कराडच्या काही समर्थकांनी राणी लक्ष्मीबाई चौकातील दगडी मनोऱ्यावर चढून कराडची सुटका करावी आणि धस व क्षीरसागर यांना अटक करावी, अशा घोषणा दिल्या.
सगळ्यांवर कारवाई हवी,देशमुख कुटुंबीयांची मागणी
‘मकोका’ची कारवाई झाल्यानंतर संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी म्हणाली की, माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली आणि जे लोक या कटामध्ये सहभागी होते, त्या सगळ्यांवर कारवाई करा. सगळ्यांना सहआरोपी करा. तेव्हाच आम्हाला न्याय मिळेल. मयत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख म्हणाले की, आम्ही आतापर्यंत म्हणतोय की आमचा पोलिसांवर विश्वास आहे, प्रशासनावर विश्वास आहे. ते नक्कीच त्यांचे काम करतील. अजून यामध्ये कोण आहेत त्या सगळ्यांना खुनाच्या गुन्ह्यात आणि ‘मकोका’मध्ये घ्यावे हीच आमची मागणी आहे.
बीडमध्ये जमावबंदीचे आदेश
सरपंच देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि मराठा-ओबीसी कार्यकर्त्यांकडून आरक्षणासंबंधी निदर्शने केली जात असल्याने बीड जिल्ह्यात २८ जानेवारीपर्यंत जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. या दोन्ही आंदोलनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
कराडच्या आईला दमानियांचे प्रश्न
कराडच्या आईने पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केल्यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कराड याच्या आईला 'वास्तव' चित्रपट पाहण्याची सूचना केली आहे. दमानिया यांनी कराड याच्या आईला उद्देशून सहा प्रश्न उपस्थित केले आहेत. वाल्मिक कराड याच्या आईंना सर्वप्रथम नमस्कार. आई आपण भोळ्या आहात, आपला मुलगा आणि नातू काय करतात याची कल्पना तुम्हाला असती तर आपण ‘माझ्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे’ असे कधीच म्हणाला नसतात. आपल्या मुलाकडे इतक्या गाड्या कुठून आल्या हा प्रश्न आपल्याला पडला नाही का, आपल्या नातवाकडे बंदूक कशासाठी आहे? हा प्रश्न आपल्याला पडला नाही का? आपला मुलगा काय उद्योग करतो हा प्रश्न आपल्याला पडला नाही का? देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर त्यांच्या पत्नीने वाल्मिक कराड याचे नाव घेतले, ते चुकीचे आहे का? आवादा कंपनीच्या लोकांनी केलेला एफआयआर खोटा आहे का, गोट्या गित्तेसारखी माणसे सद्गृहस्थ आहेत का? असे सवाल दमानिया यांनी कराड याच्या आईला विचारले आहेत.
कराडच्या आईची प्रतिक्रिया, पोलीस ठाण्याबाहेर केले ठिय्या आंदोलन
कराडच्या आईने मंगळवारी पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या आंदोलन केले, तर कराडच्या काही समर्थकांनी दगडी मनोऱ्यावर चढून आंदोलन केले. कराडची आई पारूबाई कराड या सकाळी परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर आल्या आणि मागणी मान्य होत नाही तोपर्यंत तेथून न जाण्याचा इशारा दिला. सायंकाळी पारूबाई यांची प्रकृती खालावली. माझ्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून द्या, असा पवित्रा वाल्मिक कराडच्या आईने घेतला. माझ्या मुलाने काहीही केलेले नाही. त्यामुळे त्याची सुटका करावी, माझ्या आयुष्याची अखेर झाली तरी आपण येथून हलणार नाही, असे पारूबाई यांनी वार्ताहरांना सांगितले. वाल्मिक याच्यावर गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, असे विचारले असता त्या म्हणाल्या की, यामागे कोण आहे ते आपल्याला माहिती नाही, मात्र हे सर्व प्रकरण खोटे आहे. भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार संदीप क्षीरसागर यांनी माझ्या मुलास गोवले आहे. त्यामुळे या दोन्ही आमदारांना अटक झाली पाहिजे.
आत्मदहनाचा प्रयत्न
वाल्मिक कराड समर्थकाने बीड पोलीस ठाण्यासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेतले. त्यावेळी उपस्थितांमध्ये खळबळ माजली, दोन कार्यकर्त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेतले. कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आणि आत्मदहनाचा प्रयत्न केला त्यामध्ये एका कार्यकर्त्याचा पाय चांगलाच भाजला त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही खबरदारी घेत तरुणांच्या हातातून पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली. वाल्मिक कराड समर्थकांकडून आक्रमक घोषणाबाजी केली जात होती. वाल्मिक कराडवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी समर्थकांनी केली. आत्मदहनाच्या या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.