फडणवीसांनी मुंडेंना पाठीशी घालू नये - जरांगे-पाटील

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना पाठीशी घालू नये, असे आवाहन मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केले आहे.
मनोज जरांगे पाटील, धनंजय मुंडे (डावीकडून)
मनोज जरांगे पाटील, धनंजय मुंडे (डावीकडून)
Published on

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना पाठीशी घालू नये, असे आवाहन मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केले आहे. “मुख्यमंत्र्यांनी आपण त्यांच्या मागे नसल्याचे दाखवून द्यावे. तसे न केल्यास आंदोलनाचे लोण राज्यभर उभारू,” असा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला. मनोज जरांगे म्हणाले की, “हत्येतील आरोपी पुण्यातच कसे सापडतात. धनंजय मुंडे शहाणा हो, नाहीतर आम्ही आता थांबणार नाही. ज्या मराठ्यांनी तुला साथ दिली, त्यांच्यावरच पलटण्याचा प्रयत्न करू नकोस. मुंडे जर मराठा समाजावर आरोप करत असतील, तर आम्हीही त्याला प्रत्युत्तर देऊ. तुम्ही मोर्चे काढले, तर आम्हीही मोठ्या प्रमाणावर मोर्चे काढू. मुंडेंनी हे सगळे थांबवायला हवे. मी कधीच विरोधकांना विरोध केला नाही, पण जर मराठा समाजाच्या विरोधात कुणी बोलणार असेल, तर आम्हीही गप्प बसणार नाही,”असा इशाराही त्यांनी दिला. “संतोष देशमुख यांचा खून आमच्या जिव्हारी लागला आहे. हा प्रकार जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. सरकारने यावर तातडीने कारवाई केली नाही, तर मराठा समाज राज्यभर उग्र आंदोलन करेल. संतोष देशमुख यांचे मारेकरी पुण्यात कसे सापडले? हे आरोपी बीडमधून थेट पुण्यात का आले? या प्रकरणाचा तपास योग्य प्रकारे होण्याची गरज आहे. दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” अशी मागणीही त्यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in