‘आका’कडे किती कोटींची संपत्ती? सुरेश धस यांनी जाहीर केला आकडा, सरपंच हत्येप्रकरणी पैठणमध्ये मोर्चा
छत्रपती संभाजीनगर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे काढून निषेध नोंदविण्यात आला. गुरुवारी पैठणमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात आमदार सुरेश धस सहभागी झाले होते आणि त्यांनी कोणाचेही नाव न घेताच गंभीर आरोप केले आहेत. आका आणि ‘आका’च्या ‘आका’चे परळीत वेगवेगळे उद्योग सुरू आहेत आणि पुण्यात ‘आका’कडे ७ दुकाने असून ‘आका’च्या चालकाच्या नावावर १५ कोटींचा इमारतीचा संपूर्ण एक मजला असल्याचा गंभीर आरोप सुरेश धस यांनी पैठणमधील मोर्चात केला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या बाबतीत अतिशय चुकीचे घडलेले आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी मी जाऊन आलेलो आहे. परिस्थिती गंभीर आहे. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळायलाच हवा. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर जो शवविच्छेदन अहवाल आला त्या अहवालामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीने त्यांना मारल्याचे समोर आले. एवढ्या चुकीच्या पद्धतीने कधीच कोणी मारलेले नाही. आता हे कसे घडते तर हे फक्त ‘आका’ आणि ‘आका’चा ‘आका’ यांचे वेगवेगळे उद्योग असल्यामुळे हे घडत आहे, असे सुरेश धस यांनी म्हटले आहे.
पुण्यात सात दुकानांचे बुकिंग
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय मार्गावर ‘आका’ने सात दुकानांचे बुकिंग केलेले आहे. यातील एका दुकानाची किंमत पाच कोटी आहे. तसेच यातील आठवे दुकान संतोष देशमुख यांच्या हत्येतील एका आरोपीच्या बहिणीच्या नावावर आहे. तसेच ‘आका’च्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर तीन दुकाने आहेत. पुण्यातील मगरपट्टा परिसरात एका इमारतीचा १५ कोटींचा एकच संपूर्ण मजला खरेदी केला आहे आणि हा मजला ‘आका’च्या चालकाच्या नावावर आहे, असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आहे.
परळीत इराणी समाजाचे काही लोक आहेत. हे लोक या दोघांच्या जीवावर गांजा, चरस आणि देशी-विदेशी रिव्हॉल्व्हर विक्री करतात. या इराणी लोकांकडून हिस्सा घेण्यासाठी विशेष पोलिसांची नियुक्ती ‘आका’ करत होते. थर्मलमधील भंगार दररोज चोरीला जात होते आणि त्यात पोलिसांचा वाटा आणि पोलिसांच्या वाट्यानंतर ‘आका’चा वाटा होता. एसटी महामंडळातील अनेक लोक एसटीतील काही चोरतील म्हणून त्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस होते आणि ते पोलीस ‘आका’ला जाऊन भेटायचे असा प्रघात परळीत होता, असा आरोप सुरेश धस यांनी केला.
कराडच्या मागे ईडीचा ससेमिरा
१०० कोटींची मालमत्ता असल्याने वाल्मिक कराडच्या मागे २०२२ पासून ईडीचा ससेमिरा लागला आहे, असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला. कराडला २०२२ मध्ये पहिल्यांदा ‘ईडी’ची नोटीस आली होती. कारण त्यांची संपत्ती १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली, असे धस म्हणाले.
संघटित गुन्हेगारीत वाढ
सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी पैठण येथे वार्ताहरांना सांगितले की, संघटित गुन्हेगारी वाढत चालली असून गुन्हेगारांना भय राहिलेले नाही. जे गुन्हेगारांना संरक्षण देत आहेत त्यांनीच गुन्हेगारांच्या मनातील भीती काढून टाकली आहे. संरक्षणाविना आरोपी असे कृत्य करणार नाही, आरोपींना राजकीय पाठबळ होते का, ते तपास पूर्ण झाल्यावर स्पष्ट होईल, असे धनंजय देशमुख म्हणाले.