
मुंबई : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी माझा संबंध नाही. त्यामुळे माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा पलटवार अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या विरोधकांवर केला आहे.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. या हत्येतील संशयित आरोपी वाल्मिक कराड पुणे सीआयडीला शरण आला. मात्र, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची जवळीक असल्याने तपासात अडचणी निर्माण होतील. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. मात्र, गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी सगळ्या आरोपांचे खंडन करत संतोष देशमुख यांच्या हत्येशी माझा संबंध नाही. देशमुखांच्या हत्येचा तपास सीआयडीकडे सुरू आहे. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मुंडे यांनी स्पष्ट केले. संतोष देशमुख यांच्या हत्येतील उर्वरित आरोपींना तातडीने अटक करून याप्रकरणी लवकरात लवकर आरोपपत्र तयार करून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले जावे, तसेच या घटनेतील सर्व दोषी आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी, ही मागणी मी अगदी सुरुवातीपासून करत आलो आहे. या प्रकरणात आता सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन अशी तिहेरी चौकशी सुरू असून तपासाला वेग आल्याचेही दिसत आहे, असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशी गंभीर घटना घडली तरी बीड जिल्ह्यात पालकमंत्री नाही, अशी टीका विरोधकांनी केली आहे. याबाबत मुंडे म्हणाले की, बीड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण, याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील.