
मुंबई : महाराष्ट्र पोलीसांचा मोठा दबदबा व नावलौकिक आहे, मुंबई पोलिसांची तुलना तर स्कॉटलंड यार्डशी केली जायची. अशा सक्षम पोलीस दलाची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. बीडमधील संघटीत गुन्हेगारीचा गंभीर प्रकार पाहता या प्रकरणाचा तपास विद्यमान न्यायमूर्ती यांच्या देखरेखीखाली झाला पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, राज्यातील पोलीस दल व सीआयडी आजही सक्षम आहेत पण ते राजकीय दबावाखाली असल्याने त्यांचे मनोबल कमजोर होते. आरोपी शरण येतो पण त्याला पकडू शकत नाही ही लाजीरवाणी व दुर्दैवी बाब आहे. बीड प्रकरणाने सक्षम नेतृत्व म्हणून गवगवा केला जात असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्यादाही राजकारणापुढे स्पष्ट झाल्या आहेत.
सूर्यवंशी यांना न्याय मिळेल का?
सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासित केले आहे, ही चांगली गोष्ट आहे. मात्र देशमुख यांना न्याय देण्याचे फडणवीस बोलले त्याप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळेल का, असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
आव्हाड म्हणाले की, सिव्हिल हॉस्पिटलला शेवटचा फोन कुणाचा गेला, हे सर्वांना माहीत आहे. माझ्याच तोंडातून कशाला ऐकता? याआधी देखील बापू अंधारे मर्डर प्रकरण मी आणि जयंत पाटील आम्ही लावून धरले होते. पण तेव्हा जे एसपी होते ते ऐकत नव्हते. सत्तेमध्ये नसले की काय असते ते आम्ही बघितले आहे.