
मुंबई : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी सतत पाठपुरावा करत अनेक गोष्टी उजेडात आणल्या. दमानिया यांनी देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आक्रमक भूमिका घेतल्याने त्यांच्यावर विविध माध्यमातून दबावतंत्राचा वापर केला जात आहे. मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून आक्षेपार्ह पोस्ट कमेंट केले जात असल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. या प्रकरणात तातडीने लक्ष घालत कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. दमानिया यांनी याप्रकरणी रविवारी पत्रकार परिषद घेत मुंडे बंधू-भगिनीवर आरोप केला.
मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असलेला आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी वाल्मीक कराड याचा समर्थक सुनील फड हा सुद्धा त्रास देत असल्याचे त्या म्हणाल्या. सुनील फड या व्यक्तीने माझा स्कुबा डायव्हिंगचा फोटो पोस्ट करून त्यावर अत्यंत खालच्या भाषेत लिहिले असल्याचे दमानिया यांनी यावेळी सांगितले.
या व्यक्तीच्या फेसबुक अकाऊंटवर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याच्यासोबत फोटो असल्याचे पुरावे दमानिया यांनी प्रसार माध्यमांना दिले. तसेच माझे पाच दिवसांचे कॉल रेकॉर्ड काढून मला वारंवार कॉल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी यावेळी दमानिया यांनी केली आहे.
मी केलेल्या विधानानंतर मुंडेंच्या कार्यकर्त्यांची फौज माझ्यामागे लागली आहे. मुंडेंचा आणखी एक कार्यकर्ता नरेंद्र सांगळे याने मला पहिल्यांदा फोन केला होता. त्यानंतर या माणसाने माझा फोन नंबर सोशल मीडियावर टाकून मला अनेकांना फोन करायला लावले. गेल्या तीन दिवसांपासून दिवसाला ७०० हून अधिक फोन मला येत आहेत. त्यामुळे आज चौथ्या दिवशी वैतागून मी या संदर्भातील पोस्ट केली आहे. या नरेंद्र सांगळेने माझ्याविषयी सोशल मीडियावर अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेचा वापर करून पोस्ट केल्या आहेत.
- अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या