संतोष देशमुख हत्या प्रकरण : मारेकऱ्यांना सोडणार नाही! मुख्यमंत्र्यांचे धनंजय देशमुखांना आश्वासन

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकाऱ्यांना सोडणार नाही. त्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल, ज्यामुळे गुन्हेगारांना एक कडक संदेश मिळेल, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना दिला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरण : मारेकऱ्यांना सोडणार नाही! मुख्यमंत्र्यांचे धनंजय देशमुखांना आश्वासन
एक्स @CMOMaharashtra
Published on

मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकाऱ्यांना सोडणार नाही. त्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल, ज्यामुळे गुन्हेगारांना एक कडक संदेश मिळेल, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना दिला आहे. संतोष देशमुख प्रकरणात जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना माफी नाही. यामागे कुणीही असेल त्याला शिक्षा मिळेल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईत भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे आमदार सुरेश धस हे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर धनंजय देशमुख यांनी पत्रकारांना सांगितले की, आमच्याकडे काही गोष्टी आणि पुरावे होते ते मुख्यमंत्र्यांना दाखवले. त्यावर चर्चा केली. आमची भूमिका ही न्यायची आहे. आम्हाला फक्त न्याय हवा आहे. निःपक्षपातीपणे तपास झाला पाहिजे. यामागे कोणीही असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे, अशी आम्ही मागणी केली आहे. एफआयआरमध्ये ज्या काही गोष्टी आहेत, त्यामधील सर्वांचे सीडीआर तपासावे, अशी मागणी आम्ही केली आहे.

कराड-धनंजय मुंडेंमुळेच पंकजांचा लोकसभेला पराभव

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या लोकसभेतील पराभवानंतर त्यांचा माझ्याविषयी गैरसमज झाला. लोकसभा निवडणुकीला बीड तालुक्यात ९८ हजार मते विरोधात गेल्याने पंकजा मुंडे यांची जागा निवडून आली नाही. ही मते कुणामुळे विरोधात गेली? वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यामुळेच पंकजा मुंडे यांचा पराभव झाला, असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे.

“बजरंग सोनावणे लोकसभा निवडणुकीत निवडून आले. धनंजय मुंडे आणि बजरंग सोनावणे पूर्वी फार चांगले मित्र होते. या दोघांच्या मैत्रीचे वाटोळे विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांनी केले. तेव्हापासून बजरंग सोनावणे विरोधात गेले, ते गेले नसते तर पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या नसत्या. दुसऱ्या कुणालाही उमेदवारी दिली असती तरीही पंकजा मुंडे निवडून आल्या असत्या. बजरंग सोनावणेंसारखा तगडा उमेदवार तिकडे गेल्याने फटका बसला,” असा दावाही सुरेश धस यांनी केला.

आरोपींची अवस्था ‘तेरे नाम’मधील सलमानसारखी झाली पाहिजे : धस

या प्रकरणात उज्ज्वल निकम यांना केस कशी मिळेल, यासाठी मी प्रयत्न करत आहे. आरोपींना बिनभाड्याच्या खोलीत ठेवले पाहिजे. जवळचे नातेवाईक, मित्रमंडळ कुणालाही त्यांना भेटता आले नाही पाहिजे. यांना एकटे पडू द्या. आकाची आणि आरोपींची अवस्था ‘तेरे नाम’ चित्रपटातील सलमान खानसारखी झाली पाहिजे. हे खुळेच झाले पाहिजेत, असे वक्तव्यही सुरेश धस यांनी केले.

मुंडे बंधू-भगिनींच्या राजीनाम्यासाठी सकल मराठा समाज आक्रमक

लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे सकल मराठा समाजाकडून मंगळवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे लातूर - परभणी रोडवरील वाहतूक खोळंबली आणि वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. उदगीर आणि अहमदपूर तालुक्यातही अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांकडून अनेक मागण्या करण्यात आल्या. “पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा. संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्या. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करा. यासोबतच त्यांच्या कुटुंबीयांमधील एकाला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे,” अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

धनंजय देशमुख यांनी याचिका घेतली मागे

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात केलेली याचिका मागे घेतली आहे. वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करा आणि मकोका लावावा, अशी मागणी त्यांनी याचिकेत केली होती. तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी याचिकेत केली होती. याचिका मागे घेतल्यानंतर धनंजय देशमुख म्हणाले की, पोलीस, सीआयडी योग्य प्रकारे तपास करत असल्यामुळे याचिका मागे घेत आहे.” हत्येचा मास्टरमाइंड असलेल्या वाल्मिक कराडवर आजही हत्येच्या आरोपात गुन्हा दाखल झालेले नाही, असे असतानाही धनंजय देशमुख यांनी याचिका मागे घेतल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in