
बीड/केज : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणी मागितल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराड याने विष्णू चाटेच्या भ्रमणध्वनीवरून पवनचक्की कंपनीकडे दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली, त्याबाबतचे कॉल रेकॉर्ड सीआयडीच्या हाती लागल्याने कराड याचा पाय आणखी खोलात गेला आहे. दरम्यान, खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या विष्णू चाटेला केज कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खंडणीच्या प्रकरणात त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी चाटेवर खुनाचाही गुन्हा दाखल आहे. त्यामुळे एसआयटीला त्याचा ताबा मिळू शकतो.
सीआयडीचे अधिकारी हे कॉल रेकॉर्ड तपासत असून हा आवाज वाल्मिक कराडचाच आहे का, याची पडताळणी सुरू आहे. ‘दोन कोटी दे अन्यथा तुझे हातपाय तोडीन आणि कायमची वाट लावीन’, अशी धमकी वाल्मिक कराडने कंपनीच्या अधिकाऱ्याला दिल्याचा आरोप केला जात आहे. सीआयडी कोठडीत असणाऱ्या वाल्मिक कराडची अवस्था सध्या बिकट झाली आहे. सध्या तो तणावात असून त्याला व्यवस्थित झोपही येत नसल्याने त्याचे डोळे लालबुंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांनी आणि नेत्ररोग तज्ज्ञांनी बुधवारी सायंकाळी ७ वाजता त्याची तपासणी केली. जास्तीचे जागरण आणि तणावामुळे असे डोळे लाल होऊ शकतात, असे तज्ज्ञांनी सांगितले. कराड हा ३१ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यात शरण आला. यावेळी त्याच्यासोबत दोन व्यक्ती आणि पांढरी गाडी होती. ही गाडी आता सीआयडीने जप्त केली आहे. गाडीमालक शिवलिंग मोराळेसह अन्य मदत करणारे लोकदेखील सीआयडीच्या रडारवर आहेत.
सुनील केदू शिंदे हे ‘आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्याकडे केज तालुक्यातील विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्पाची मांडणी आणि उभारणीचे काम आहे. सुनील शिंदे यांनाच विष्णू चाटे याने फोन करून वाल्मिक कराडला बोलायचे असल्याचे सांगितले होते. यावेळी वाल्मिक कराडने धमकी दिली होती, अशी माहिती आहे. हे संपूर्ण संभाषण सुनील शिंदे यांच्या मोबाइलमध्ये झाले आहे. त्यावरून खंडणी प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला होता. हेच रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती लागले आहे. तो आवाज कराड, चाटे यांचाच आहे का, यासाठी आवाजाचे नमुने तपासले जात आहेत.
दरम्यान, विष्णू चाटेला केज कोर्टात हजर केल्यानंतर केवळ सात मिनिटांमध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपला. त्यानंतर कोर्टाने चाटेला न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, चाटेवर खुनाचाही गुन्हा दाखल आहे. त्यामुळे एसआयटीकडून त्याला अटक होऊ शकते. हत्याप्रकरणी विष्णू चाटेचा ताबा मिळवण्यासाठी एसआयटीकडून कोर्टात अर्ज करण्यात येणार आहे. न्यायालयाने परवानगी दिली तर हत्येच्या गुन्ह्यात विष्णूला अटक होईल. त्यानंतर एसआयटीकडून खून प्रकरणात त्याची चौकशी होईल.
फरार आरोपीला पकडण्याची मुदत संपली, गावकरी पुढील आंदोलनाच्या तयारीत
मस्साजोगमधील ग्रामस्थांनी येत्या काही दिवसांत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय घेतला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपीला पकडण्यासाठी ग्रामस्थांनी पोलिसांना ११ जानेवारीपर्यंतची मुदत दिली होती. गेल्या आठवड्यात ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलनही केले होते. येत्या एक-दोन दिवसांत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. निर्णय सर्वानुमते घेण्यात येणार आहे. पोलिसांना आम्ही मुदत दिली होती ती संपुष्टात येत आहे, असे एका ग्रामस्थाने सांगितले. ग्रामस्थ गेल्या एक महिन्यापासून तंबूत वास्तव्य करून आहेत. देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी त्यांची मागणी आहे. या हत्या प्रकरणातील सहावा आरोपी अद्याप फरार आहे.
पप्पा, आम्हाला माफ करा!
सरपंच देशमुख हत्येच्या निषेधार्थ राज्यात विविध ठिकाणी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आणि देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. जालना येथेही शुक्रवारी एक मोर्चा आयोजित करण्यात आला होता, मात्र त्या मोर्चात बोलताना देशमुख यांच्या कन्येला शोक अनावर झाला आणि मोर्चात सहभागी झालेले सारेजण हेलावले. पप्पा, जेथे असाल तेथे हसत राहा, आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही, आम्हाला माफ करा, असे वैभवी देशमुख म्हणाल्या तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले.
वैभवी देशमुख म्हणाल्या की, आज आमचा आनंद आमच्यापासून हिरावून घेतला आहे. मात्र इथे जमलेल्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळेच आम्ही उभे राहू शकलो. तुमच्यामुळेच आम्ही न्यायाचा लढा पुढे नेऊ शकत आहोत. आपल्याला न्याय मिळवायचा आहे. त्यासाठी तुम्ही मानवतेच्या नात्याने एकत्र येऊन आमच्या कुटुंबीयांच्या पाठीमागे उभे राहिलात, तसेच आमच्या पाठीमागे सदैव उभे राहा. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध नोंदवण्यासाठी जालना येथे मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्यावतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.