
बीड : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना बीड जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याची गंभीर घटना घडली आहे. मकोका कायद्यांतर्गत आरोपी असलेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे दोघे सध्या बीडच्या कारागृहात कैद आहेत. त्याचवेळी शिक्षा भोगत असलेल्या महादेव गीत्ते आणि अक्षय आठवले या आरोपींनी या दोघांना मारहाण केल्याची माहिती आहे. मात्र, कारागृह प्रशासनाने हे वृत्त फेटाळले असून कराड आणि घुले यांना कारागृहात कोणतीही मारहाण झाली नसल्याचे म्हटले आहे.
सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास कैद्यांना नाश्ता दिला जात असताना दोन गटात काही मुद्द्यांवरून बाचाबाची झाली. त्यानंतर त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. याच कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेवर हल्ला केला. सूत्रांच्या माहितीनुसार, सुरुवातीला या सर्वांमध्ये कराडला तीन ते चार वेळा कानशिलात लगावल्याची माहिती आहे. मात्र त्या दोघांना नव्हे तर आम्हालाच मारहाण झाल्याचा दावा महादेव गित्ते याने केला आहे. कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे, यामागची खरी परिस्थिती समोर येईल, असेही महादेव गित्ते याने दुसऱ्या कारागृहात जात असताना सांगितले.
बीड जिल्हा कारागृहाने मात्र हे वृत्त फेटाळून लावले आहे. “न्यायाधीन बंदी वाल्मिक कराड आणि त्याचे सहकारी सुदर्शन घले यांना कारागृहात बेदम मारहाण करण्यात आली, अशी माहिती प्रसारमाध्यमांवर सुरु आहे. परंतु प्रत्यक्षात कराड व घुले यांना कोणत्याही प्रकारची मारहाण कारागृहात झालेली नाही,” असेही बीड जिल्हा कारागृह अधीक्षक बी. एन. मुलाणी यांनी पत्रकात म्हटले आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी हा सर्व घटनाक्रम उलगडून सांगितला. “आपांपसातील टोळी युद्धामुळे ही घटना घडली आहे. कराड व घुलेला फक्त मारहाण झाली आहे. विशेषत: वाल्मीकला केवळ २ कानशिलात लगावण्यात आल्यात. त्यामुळे त्याला रुग्णालयात वगैरे दाखल करण्याची काहीही गरज नाही,” असे धस यांनी सांगितले.
गित्तेसह ४ जणांना ‘हर्सूल’ला हलवले
बीड जिल्हा कारागृहात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली महादेव गित्ते आणि त्याच्या चार साथीदारांना बीड कारागृहातून छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात हलवण्यात आले आहे. महादेव गित्ते, मुकुंद गित्ते, राजेश नेहरकर यांसह आणखी एकाची छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली.