
बीड : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास चार महिने उलटून गेले असून गुरुवारी याप्रकरणी बीडच्या कोर्टात सुनावणी पार पडली, त्यावेळी मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची चल आणि अचल स्थावर मिळकत जप्त करण्यात यावी, असा अर्ज विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात केला आहे. त्याचबरोबर या हत्येचा मुख्य सूत्रधार आणि आरोपी वाल्मिक कराडनेही कोर्टात अर्ज दाखल केला असून आपण निर्दोष असल्याचा व या खुनाशी काहीही संबंध नसल्याचा दावा त्याने केला आहे.
“वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करावी, असा अर्ज न्यायालयात करण्यात आला आहे. वाल्मिक कराडच्या संपत्तीची माहिती सीबीआयकडून घेतली जात आहे. वाल्मिक कराडच्या नावे मोठी गडगंज संपत्ती असल्याचे सांगितले जाते. पुण्यातील महागड्या सोसायटीतदेखील त्याचा फ्लॅट आहे,” असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले. संपत्ती जप्त करा, असा अर्ज कोर्टात दाखल झाल्याने कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोकाअंतर्गत कारवाईही करण्यात आली आहे. दुसरीकडे ‘माझ्या विरोधात पुरावा नाही. मला दोषमुक्त करा’, अशी याचिका वाल्मिक कराडने कोर्टात दाखल केली आहे. ‘माझा या प्रकरणात संबंध नाही, खुनात आणि खंडणीतही’, असेही कराडने आपल्या अर्जात म्हटले.
“न्यायालयामध्ये गुरुवारी आम्ही जी कागदपत्रे सादर केली, त्यातील संतोष देशमुख यांना झालेल्या मारहाणीचा प्रत्यक्ष व्हिडीओ, तो आरोपींनीच काढला होता, असे सीआयडीच्या तपासात दिसून आले होते. तसेच तो सीलबंद परिस्थितीत, फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आला होता. तो संपूर्ण व्हिडीओ आम्ही न्यायालयात हजर केला, पण या व्हिडीओला कोणत्याही प्रकारे बाहेर प्रसिद्धी मिळू नये, अशी विनंती आम्ही न्यायालयाकडे केली आहे. तो बाहेर आल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणून मकोका कायद्याच्या तरतुदीअंतर्गत आम्ही न्यायालयाला ही विनंती केली आहे. त्यावर न्यायालयाने सर्व आरोपींचे म्हणणे मागितले आहे. त्यांचे म्हणणे २४ तारखेला न्यायालयासमोर सादर करण्यात येईल,” असेही निकम यांनी सांगितले.
मी निर्दोष - कराडचा कोर्टात अर्ज
वाल्मिक कराडने त्याच्या अर्जात अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. माझा या प्रकरणात कुठेही काहीही संबंध नाही, मी खुनामध्ये नाही, खंडणी मी मागितली नाही. मी कसा निर्दोष आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न त्याने कोर्टात दाखल केलेल्या अर्जामध्ये होता, असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले. वाल्मिक कराडने कोर्टाकडे खटल्याशी संबंधित कागदपत्रांची मागणी केली होती. देशमुख हत्या आणि खंडणीच्या प्रकरणात आपला संबंध नाही, हे दाखवण्याचा वाल्मिकचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर येत्या २४ एप्रिलला सीआयडीचे म्हणणे न्यायालयात सादर केले जाईल, त्यानंतर त्यावर सविस्तर सुनावणी होईल.