
मुंबई : मारामारीस विधानभवनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असून त्यांनी पश्चात्ताप म्हणून राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. महिलांची सुरक्षा, बेरोजगारी, अमली पदार्थांचा सुळसुळाट शेतकऱ्यांची कर्ज माफी यावर पावसाळी अधिवेशनात चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र अधिवेशनात वाटाण्याच्या अक्षता लावल्याची टीका सपकाळ यांनी केली.
'ना हनी, ना ट्रप' असे मुख्यमंत्री विधान सभेत म्हटले असले तरी 'हनी ट्रॅप'चे धागेदोरे समृद्धी महामार्गातील २० हजार कोटींच्या भ्रष्टाचारापर्यत पोहोचलेत, असा गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. टिळक भवनात आयोजित पत्रकार परिषदेत सपकाळ बोलत होते.
भाजपाने जे पेरले तेच उगवले
आमदार निवासाच्या कॅन्टीमध्येही एका आमदाराने डब्लू डब्लू एफ केले. आमदारांना मवाली म्हटले जाते, असे मुख्यमंत्री म्हणतात, हे भाजपाने जे पेरले तेच उगवले आहे. आणि हा डाव आता भाजपावरच उलटत आहे, असेही सपकाळ म्हणाले.
हनी ट्रॅपचे धागेदारे समृद्धीच्या भ्रष्टाचारात !
राज्यातील काही अधिकारी व मंत्री हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत हे सत्य आहे. मुख्यमंत्री जरी असे काही घडलेले नाही असे म्हणत असले तरी ते नेहमीप्रमाणे खोटे बोलत आहेत. या हनीट्रॅपचे धागेदोरे समृद्धी महामार्गातील २० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारापर्यंत पोहोचलेले आहेत. हा घोटाळा उघड होऊ नये म्हणून तो दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, फडणवीस जे बोलले ते धादांत खोटे आहे, असेही सपकाळ म्हणाले.
जन सुरक्षा विधेयकाला विरोधच !
काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासून जन सुरक्षा विधेयकाला विरोध केला आहे. या विधेयकासाठी नियुक्त केलेल्या समितीवरही अनेक आक्षेप घेण्यात आले आहेत. बजरंग दल, आरएसएस या संघटनाही या कायद्याच्या कक्षेत येतात का, असा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार काही बोलत नाहीत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. काँग्रेसचा या विधेयकाला विरोध आहे आणि विधिमंडळाच्या आत व बाहेरही विरोधच राहील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी ठामपणे सांगितले.