ब्रेन स्ट्रोकनंतर साकिब नाचन अत्यवस्थ

ब्रेन स्ट्रोकनंतर साकिब नाचन अत्यवस्थ

बंदी घालण्यात आलेल्या स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) संघटनेचा माजी पदाधिकारी आणि दिल्ली-पडघा आयएसआयएस दहशतवादी मोड्यूल प्रकरणातील प्रमुख आरोपी साकिब अब्दुल हमीद नाचन (वय ६३) ब्रेन स्ट्रोकनंतर ‘अत्यंत गंभीर’ अवस्थेत असल्याचे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले.
Published on

आशिष सिंह/मुंबई

बंदी घालण्यात आलेल्या स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) संघटनेचा माजी पदाधिकारी आणि दिल्ली-पडघा आयएसआयएस दहशतवादी मोड्यूल प्रकरणातील प्रमुख आरोपी साकिब अब्दुल हमीद नाचन (वय ६३) ब्रेन स्ट्रोकनंतर ‘अत्यंत गंभीर’ अवस्थेत असल्याचे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले.

नाचन यांना न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यांना सोमवारी दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अधिकच खालावल्यामुळे त्यांना बुधवारी सकाळी सफदरजंग रुग्णालयात पुढील उपचारांसाठी हलवण्यात आले.

राष्ट्रीय तपास यंत्रणाच्या सूत्रांनी सांगितले की, नाचन सध्या आयसीयूमध्ये डाॅक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे.

नाचन यांना २०२३ मध्ये भारतामधील आयएसआयएस नेटवर्कचा स्वयंघोषित ‘अमीर-ए-हिंद’ (भारत प्रमुख) म्हणून काम करत असल्याच्या आरोपाखाली एनआयएने अटक केली होती. त्यांच्यावर तरुणांना कट्टरपंथी बनवणे, गटासाठी कार्यकर्त्यांची भरती करणे आणि संपूर्ण देशभर – विशेषतः महाराष्ट्रात – या संघटनेचा विस्तार घडवून आणण्याचा आरोप आहे.

हे प्रकरण दिल्ली-पडघा आयएसआयएस दहशतवादी मोड्यूलविरोधातील एनआयएच्या व्यापक मोहिमेचा एक भाग आहे, ज्यात गेल्या वर्षभरात अनेक अटकसत्रे झाली.

एनआयएने या गटाचे वर्णन अत्यंत संघटित, डिजिटलदृष्ट्या कुशल आणि बेकायदेशीर मार्गाने निधी उभारणारा, एनक्रिप्टेड कम्युनिकेशन वापरणारा आणि भारतात हल्ल्यांची योजना आखणारा असा केला आहे.

तिहार तुरुंग प्रशासनाने नाचन यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. पडघा गावातील सूत्रांनी सांगितले की, त्यांचा मुलगा आणि जावई दिल्लीला पोहोचले असून ते सध्या रुग्णालयात उपस्थित आहेत.

logo
marathi.freepressjournal.in