
बीड : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शनिवारी जवळपास ८० दिवसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटचा साथीदार वाल्मिक कराड हाच देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे आरोपपत्रामध्ये म्हटले आहे. गोपनीय साक्षीदारांनी दिलेल्या जबाबामुळे कराड याच्या विरोधात पुरावे मिळाल्याचेही स्पष्ट करण्यात आले असून त्यामुळे कराडच्या गळ्याभोवतीचा फास अधिकच घट्ट झाला आहे.
खंडणी, ॲट्रॉसिटी, हत्या तीनही घटनांचा आरोपपत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे. सुदर्शन घुले याच्या दूरध्वनीवरून २९ नोव्हेंबर रोजी वाल्मिक कराड याने खंडणी मागितली होती. संतोष देशमुख यांचा आरोपी घुले याच्यासह ६ तारखेला वाद झाला होता, असे या आरोपपत्रात म्हटले आहे. वाल्मिक कराड याच्या विरोधातील सर्व पुरावे पोलिसांनी गोळा केले आहेत. तसेच पाच गोपनीय साक्षीदारांनी जबाब दिला आहे.
व्हीडिओ सीआयडीकडे आरोपपत्रात वाल्मिक कराड एक क्रमांकाचा आरोपी आहे तर विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे आणि कृष्णा आंधळे (फरार) यांचे अनुक्रमे दोन ते आठ क्रमांकाचे आरोपी म्हणून उल्लेख आहे. संतोष देशमुख यांची हत्या ही पूर्णतः खंडणी वादामधून झाल्याचे आरोपपत्रातून सिद्ध झाले आहे. आवादा कंपनीकडे खंडणी मागितली होती आणि या खंडणीनंतर झालेल्या वादामध्ये संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली.
संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले मारहाण करतानाचा व्हीडिओ सुद्धा सीआयडीच्या हाती लागला आहे. सुदर्शनच्या फोनवरूनच वाल्मिक कराडने खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर सहा डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळे याच्याशी वाद झाला होता. ही माहिती आता पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर मिळाल्याने कराडविरुद्ध पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणांमध्ये वाल्मिक कराड हाच प्रमुख सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आरोपपत्रात काय?
पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातील काही माहिती आता समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या, खंडणी प्रकरण एकत्रित करून हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आरोपपत्रात म्हटले आहे की, ७ तारखेला सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला कॉल केला होता. त्यावेळी वाल्मिक कराडने घुलेला सांगितले की, 'जो तो उठेल आणि आपल्या आड येईल, तर आपण कुणालाही सोडणार नाही. वाल्मिक कराडशी बोलणे झाल्यावर सुदर्शन घुलेने आवादा कंपनीच्या कार्यालयात कॉल केला आणि धमकी दिली. त्यानंतर ८ तारखेला सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि एक गोपनीय साक्षीदार यांची नांदूर फाट्यावरील तिरंगा हॉटेलमध्ये भेट झाली. त्यावेळी विष्णू चाटे याने सुदर्शन घुलेला वाल्मिक कराडचा निरोप सांगितला. गोपनीय साक्षीदाराने दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, तिरंगा हॉटेलमध्ये जी बैठक झाली. त्यावेळी वाल्मिक कराडने विष्णू चाटेच्या माध्यमातून सुदर्शन घुलेला निरोप पाठवला होता की, संतोष देशमुख आडवा आला, तर त्याला कायमचा धडा शिकवा. आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या, तर त्याचे काय परिणाम होतात, हा संदेश इतरांना द्या, असेही कराडने म्हटले होते.
धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढणार ?
हत्या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार कराड असल्याचे सिद्ध झाल्याने राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याही अडचणीमध्ये आता वाढ होणार आहे. त्यामुळे जोपर्यंत पुरावे मिळणार नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात कारवाई केली जाणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात आली होती. आता प्रमुख आरोपी मिळाल्याने धनंजय मुंडे यांच्याविरोधात कोणती कारवाई केली जाणार, याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष राहणार आहे.