नागपूर : भारत हिंदूंचा देश, तरी देखील येथे मुस्लीमही सर्वाधिक सुरक्षित आणि हे हिंदूच करु शकतात अशी प्रतिक्रिया सरसंघचालक मोहन भागवत यांनी छत्रपति शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त एका शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले. इस्त्रायल-हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेले हे पहिलेच विधान आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या युद्धासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केले आहे. हिंदू धर्म सर्वच संप्रदायांचा आदर करतो. भारतात कधीही अशा मुद्द्यांवरून भांडणे झाली नाहीत, ज्यांवरून आज हमास आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. हा हिंदूंचा देश आहे आणि येथे मुस्लीमही सर्वाधिक सुरक्षित आहेत. हे केवळ हिंदूच करू शकतात, असे भागवत यांनी म्हटले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५०व्या राज्याभिषेक दिनानिमित्त एका शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भागवत बोलत होते. ते म्हणाले, ‘‘या देशात एक धर्म, संस्कृती अशी आहे, जी सर्व संप्रदायांचा आणि आस्थांचा आदर करते. ती संस्कृती म्हणजे हिंदू धर्म. हा हिंदूंचा देश आहे. याचा अर्थ आम्ही इतर धर्म स्वीकारत नाही, असा नाही.’’
भागवत म्हणाले, ‘‘आपण जेव्हा हिंदू म्हणता, तेव्हा मुस्लिमांनाही सुरक्षा देण्यात आली आहे, हे सांगण्याची गरज पडत नाही. केवळ हिंदूच असे करतात. केवळ भारतच असे करतो. दुसऱ्या देशांमध्ये असे होत नाही. सर्वत्र संघर्ष होत आहेत. आपण यूक्रेन युद्ध आणि हमास-इस्राइल युद्धासंदर्भात तर ऐकलेच असेल. आपल्या देशात अशा मुद्द्यांवरून कधीच युद्ध झाले नाही. शिवाजी महाराजांच्या काळात झालेले आक्रमण त्याच प्रकारचे होते. मात्र, आम्ही या मुद्द्यावर कधीही कुणासोबतही लढलो नाही. यामुळेच आपण हिंदू आहोत, असेही भागवत म्हणाले.