सिंधुदुर्गातील ‘सासोली’त अमली पदार्थ तस्करीचा अड्डा ;गुप्तचर यंत्रणांची गावावर नजर

सिंधुदुर्ग-गोव्या दरम्यानच्या सीमावर्ती भागात गस्त वाढवावी, असे पोलीस महासंचालकांच्या बैठकीत ठरले
सिंधुदुर्गातील ‘सासोली’त अमली पदार्थ तस्करीचा अड्डा ;गुप्तचर यंत्रणांची गावावर नजर

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २ हजार लोकवस्तीचे शांत, सुशेगाद ‘सासोली’ गाव देशात सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. गोव्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या गावात अमली पदार्थांच्या तस्करांनी अड्डे बनवले आहेत. हे गाव देशभरात अमली पदार्थ वितरणाचे केंद्र बनल्याची माहिती वरिष्ठ पोलिसांच्या बैठकीत देण्यात आली. या तस्करांवर गुप्तचर यंत्रणांनी बारीक नजर ठेवली आहे.

अमली पदार्थांच्या तस्करीसाठी अल्पावधीत सासोली लोकप्रिय झाले आहे. यासाठी गावात समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांच्या तस्करांनी मोठी गुंतवणूक केली आहे. हे गाव गोव्याच्या नवीन मोपा विमानतळापासून अवघ्या १५ मिनिटांवर आहे. त्यामुळे इस्त्रायली, जर्मन, नायजेरियन, रशियन लोकांनी एलएसडी, एक्स्टेसी, कोकेनचा पुरवठा भारतातील विविध शहरात करण्यासाठी गावात गुंतवणूक केली आहे. या ठिकाणाहून मुंबई, गोवा, बंगळुरू, हैदराबाद व दिल्लीत अमली पदार्थ पाठवले जातात.

गेल्या तीन वर्षांत गोवा पोलिसांनी ६१ परकीय नागरिकांना अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी अटक केली. त्यातील बहुतांश नायजेरियन आहेत. सासोलीतील तरुण रोज गोव्याला कामाला जातात, तर बाहेरील व्यक्ती गावात मोठ्या प्रमाणात जमिनी विकत घेत आहेत. गावाबाहेरील जागांचा वापर गैरकामांसाठी केला जात आहे, अशी माहिती स्थानिक गावकरी यशवंत नाईक यांनी दिली.

गेल्या महिन्यात महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, केंद्रशासित प्रदेश दादरा, नगर हवेलीच्या पोलीस महासंचालकांची बैठक झाली. त्यात सासोलीतून अमली पदार्थांची तस्करी वाढल्याचा मुद्दा उपस्थित झाला. गुप्तचर यंत्रणांनी त्याची माहिती पोलिसांना दिली.

गोव्यातील स्थानिक नेटवर्क हशीश, गांजा, अफू हे अमली पदार्थ मनाली, ओदिशा, मुंबई व बंगळुरूतून आणतात, तर हे अमली पदार्थ अन्य राज्यांत वितरीत करण्याचे काम पर्यटकांच्या माध्यमातून केले जाते. तसेच इस्त्रायल, नायजेरिया, इंग्लंड, जर्मनी, रशिया येथून एलएसडी, कोकेन, डीएमटी, एमडीएमए, एक्स्टेसी आदी अमली पदार्थांची तस्करी केली जाते. याचे वितरण डार्क वेबच्या माध्यमातून केले जाते. ते तपास यंत्रणापासून वाचण्यासाठी अत्यंत गुप्त पद्धतीने क्रिप्टोचे व्यवहार केले जातात.

गोव्याचा नवीन विमानतळ व एनएच ४४ ते मुंबई व बंगळुरूसाठी सासोली हे अमली पदार्थ वितरणासाठी महत्त्वाचे ठरले आहे. छोट्या माशांच्या बोटीतून समुद्रामार्ग अमली पदार्थांची वाहतूक केली जाते. कोकणची किनारपट्टीही अमली पदार्थांच्या तस्करांसाठी नंदनवन ठरत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

तस्करांकडून पायवाटांचा वापर

गोवा पोलिसांनी २८ ऑगस्ट रोजी ‘सीमेपलीकडून अमली पदार्थांची तस्करी’ या विषयावर सादरीकरण केले. त्यात सिंधुदुर्गातील अनेक कच्च्या रस्त्यांची गुप्त माहिती देण्यात आली. या भागात पोलिसांची गस्त अत्यंत कमी प्रमाणात आहे. त्यामुळे तस्कर याचा वापर अमली पदार्थांच्या तस्करीत करत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग-गोव्या दरम्यानच्या सीमावर्ती भागात गस्त वाढवावी, असे पोलीस महासंचालकांच्या बैठकीत ठरले. त्याची माहिती तातडीने दोन्ही राज्यांच्या पोलिसांना देण्यात यावी, असेही सुचवण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in