

पुणे : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सावरी गावात अंदाजे ११५ कोटी रुपये किंमतीचा ४५ किलो ड्रग्जसाठा सापडला आहे. या ड्रग्ज प्रकरणात सापडलेल्या व्यक्तींना एका रिसॉर्टमधून जेवण जात होते. ते रिसॉर्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय प्रकाश शिंदे यांच्या मालकीचे आहे. ते रिसॉर्ट दरेगावचे सरपंच रणजीत शिंदे चालवत होते. मात्र, साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी ही माहिती लपवल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.
पोलिसांनी या ठिकाणी कारवाई केली, पण ड्रग्सशी संबंधित ज्या तीन लोकांची नावे ‘एफआयआर’मध्ये असायला पाहिजे होती, ती नाहीत, असा आरोप करताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, “एकनाथ शिंदे यांचा भाऊ प्रकाश शिंदे याच्या जावळी तालुक्यातील सावरी गावातील असणाऱ्या रिसॉर्टच्या जवळ असलेल्या शेडवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ४५ किलो ड्रग्जचा साठा सापडला होता. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी यासंदर्भातील माहिती लपवून ठेवली होती. तसेच आता एखाद्या प्रकरणात पोराचे नाव आले तर बापाचा राजीनामा मागितला जात असेल तर मग ड्रग्ज प्रकरणात भावाचे नाव आल्यावर एकनाथ शिंदे यांचाही राजीनामा घेतला पाहिजे. यानंतर मला काहीही झाले, तर आज ज्यांची नावे मी घेतली ते लोक जबाबदार असतील,” असेही त्यांनी म्हटले आहे.
“हे प्रकरण उघडकीस आणल्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सुरक्षेची हमी द्यावी. या विषयावर राजकारण बाजूला ठेवून ते माझ्या पाठीशी उभे राहतील, अशी मला आशा आहे. उके नावाच्या वकिलाने भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, नवाब मलिक यांनीदेखील काही मुद्दे समोर आणले होते, त्यानंतर त्यांच्यासोबत काय झाले होते, हे सर्वांना माहीत आहे,” असेही सुषमा अंधारे यांनी सांगितले.
माझ्यावरील आरोप खोटे - प्रकाश शिंदे
सुषमा अंधारे यांचे आरोप साफ खोटे आहेत, हे विरोधकांचे षडयंत्र आहे. ज्या स्पॉटवर हे ड्रग्ज सापडले, तिथून तीन ते साडेतीन किमी लांब ती जागा आहे. पोलिसांच्या अहवालानुसार सर्वांनी माहिती घ्यावी. माझ्या जागेशी त्या घटनेचा काहीही संबंध नाही. तो माझा रिसॉर्ट नसून गेल्या ६ महिन्यांपूर्वी रणजीत शिंदे यांना ती जागा दिलेली आहे. तसेच, तिथे रिसॉर्ट नसून ती केवळ जागा आहे. साताऱ्याच्या एसपींना मी कधी बघितले नाही, किंवा त्या एसपींनीदेखील मला कधीही बघितलेले नाही, असे प्रकाश शिंदे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील पाब्लो शिंदेला अटक का नाही? - सपकाळ
सावरी गावात एवढा मोठा ड्रग्जचा कारखाना सुरू होता, याची कल्पना सातारा पोलिसांना होती. पण त्यांनी कारवाई केली नाही. मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केली. साताऱ्याचे पोलिस अधीक्षक व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. साताऱ्यातील ड्रग्जप्रकरणी शिंदे व फडणवीस यांची मिलीभगत आहे का? या प्रश्नाचे उत्तर फडणवीस आणि शिंदे यांनी दिले पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राज्यातील पाब्लो एस्कोबार आहेत, त्यांना अटक का नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.