

कराड : जलसंपदा विभागाच्या ओगलेवाडी (ता. कराड) येथील टेंभू उपसा सिंचन योजनेच्या कार्यालयात सुरक्षारक्षकांच्या बिलाला मंजुरी देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या कार्यकारी अभियंत्यासह कनिष्ठ महिला अभियंत्याला सातारा लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी रंगेहात पकडले. कार्यकारी अभियंता आनंद रामदास काळमेघ (रा. सिल्वर ओक बिल्डिंग, विद्यानगर, कराड) आणि कनिष्ठ अभियंता माधुरी साई देवरे (रा. सिल्वर गार्डन अपार्टमेंट, बनवडी फाटा, कराड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
तक्रारदाराने सातारा लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे दिलेल्या तक्रारीनुसार, टेंभू उपसा योजनेच्या ओगलेवाडी कार्यालयात एका सिक्युरिटी एजन्सीमार्फत प्रतिदिन ६१० रुपयांप्रमाणे तीन सुरक्षारक्षक पुरवले होते. त्यांच्या सेवेचे ५,९४,७२० रुपये मूल्य असलेले बिल कराड कार्यालयातून पुणे येथील कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे पाठवले गेले व ते मंजूर झाले. या मंजुरीनंतर १२ नोव्हेंबर २०२५ रोजी तक्रारदाराला ४,६६,९६० रुपये मिळाले. यानंतर कनिष्ठ अभियंता माधुरी देवरे यांनी बिलाच्या ३ टक्के प्रमाणे १७ हजार रुपयांची लाच मागितली. तसेच कार्यकारी अभियंता काळमेघ यांना भेटावे, असा सल्ला दिला.
तक्रारदाराने काळमेघ यांची भेट घेतली असता त्यांनी ३० हजार रुपये लाच मागितली. तडजोडीनंतर त्यांनी २५ हजार रुपये देणे भाग आहे, असे सांगितले. तक्रारदाराने सातारा लाचलुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क साधल्यानंतर विभागाने शुक्रवारी सायंकाळी सापळा रचला. या कारवाईत आनंद काळमेघला २५,००० रुपये तसेच माधुरी देवरेला १७,००० रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. रात्री उशिरा कराड शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.