
कराड : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून पुढील चार दिवसात कोकणातील सहा जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर सातारा जिल्ह्यात पुढील चार दिवसांत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शुक्रवारी राज्याच्या बहुतांश भागात कोरडे हवामान पाहायला मिळले असले तरी पुढील चार दिवसांत कोल्हापूरच्या घाटभागात आणि सिंधुदुर्गात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यातल पश्चिम भागांत मागील तीन आठवड्यांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सध्या पूर्व भागात पावसाची उघडीप असली तरी पश्चिमेकडे दमदार हजेरी आहे. यामुळे कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह कांदाटी खोऱ्यात ओढे, नाले भरभरून वाहू लागलेत. प्रमुख धरणांतील पाणीसाठाही वेगाने वाढू लागला आहे. परिणामी पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून विसर्ग करण्यात येऊ लागला आहे. दरम्यान, कराड, सातारा शहरात पावसाचे प्रमाण कमी झाले असून शुक्रवारी सकाळी काही प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. पण, बहुतांशीवेळा ढगाळ वातावरण तयार झालेले होते, तर सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात मात्र, पाऊस होत आहे. पूर्व भागात पावसाची उघडीप आहे.
पाटण तालुक्यातील अतिवृष्टी, भूस्खलन बाधीत १८६ शाळा आहेत. महाबळेश्वर तालुक्यातील ११८ व जावली तालुक्यातील ३० शाळा आहेत. उन्हाळ्यात मात्र या शाळा सुरू असतात. यंदा पाऊस अधिक असल्याने विद्यार्थ्यांना शाळेतच जाता येत नाही. पाटण तालुक्यातील १८६, महाबळेश्वर तालुक्यातील ११८ व जावली तालुक्यातील ३० शाळा अशा मिळून ३३४ शाळांना पावसाळी सुट्टी देण्यात आली आहे.
याबाबतच्या आवश्यक त्या सूचना गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सातारा जिपच्या शिक्षण विभागातून देण्यात आली आहे.
हवामान खात्याचा इशारा
पुढील चार दिवसांत कोल्हापूरच्या घाटभागात आणि सिंधुदुर्गात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रमध्ये नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर आणि घाटमाथ्याच्या भागांमध्ये येत्या चार दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर, सातारा व पुणे घाटमाथ्यावर दरड कोसळण्याचा धोका असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
कोयना धरण ५६ टक्के भरले
कोयना धरणात पाण्याची आवक वाढल्याने पाणीसाठा ५९.७० टीएमसी झाला आहे.त्यामुळे सुमारे ५६ टक्के धरण भरले, तर कण्हेर धरणक्षेत्रातही पाऊस सुरूच असल्याने विसर्गात वाढ करण्यात येत आहे. त्यातच बहुतांशी मोठी धरणे ही ७० टक्क्यांपर्यंत भरलेली आहेत. कोयना धरणात सुमारे ३१ हजार क्युसेक वेगाने पाणी येत असून त्यामुळे सायंकाळी ५ वापर्यंत धरणात ५९.७० टीएमसी पाणीसाठा झाला होता. सध्या धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू असून, त्यातूनच १ हजार ५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. दरम्यान, एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगर येथे १ हजार ८२९ मिलिमीटर पाऊस झाला आहे, तर नवजाला १ हजार ६२० आणि महाबळेश्वर येथे १ हजार ७०४ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे.
जिपच्या ३३४ शाळांना पावसाळी सुट्टी
सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर व जावळी तालुक्याच्या पश्चिमेकडील सह्याद्री पर्वत रांगांच्या पठारी व पायथ्याच्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जावली, महाबळेश्वर, कराड व पाटण या तालुक्यातील पावसाळी भागांतील शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर केली आहे. ३३४ जिल्हा परिषद शाळांना सुमारे पावसाळी सुट्टी देण्यात आली आहे.