साताऱ्यात वाहन धुणे, स्विमिंग पूलवर बंदी; पाणीवापर संस्थांमार्फत सिंचनाचे नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन

सातारा जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट तीव्र होत असताना उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाणी बचतीचे कडक निर्देश जारी केले आहेत.
साताऱ्यात वाहन धुणे, स्विमिंग पूलवर बंदी; पाणीवापर संस्थांमार्फत सिंचनाचे नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन
साताऱ्यात वाहन धुणे, स्विमिंग पूलवर बंदी; पाणीवापर संस्थांमार्फत सिंचनाचे नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन
Published on: 

कराड : सातारा जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट तीव्र होत असताना उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाणी बचतीचे कडक निर्देश जारी केले आहेत. वाहन धुणे, स्विमिंग पूलचा वापर आणि नवीन बांधकामांसाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच अनधिकृत बोअरवेल खोदणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

कमी पावसामुळे भूजल पातळीत घट झाली असून विहिरी, बोअरवेल, नद्या आणि अन्य जलस्रोतांमधील पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

ग्रामीण भागात धरणे, कालवे, नद्या व तलावांमधून पिण्याव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी होणारा अनधिकृत पाणीउपसा रोखण्यासाठी महसूल व जलसंपदा विभागाची संयुक्त पथके गस्त घालणार आहेत. टँकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या गावांमध्ये पाण्याचा वापर जपून करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, जलसेवा संकल्प अभियानांतर्गत वडूज (ता. खटाव), काळेवाडी (ता. माण) आणि कोरेगाव येथे पाणीवापर संस्थांची स्थापना, व्यवस्थापन आणि सिंचनाचे नियोजन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य वितरण, सामूहिक सहभाग आणि पाण्याचा कार्यक्षम वापर यांचे महत्त्व पटवून देण्यात आले. या उपक्रमाला शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. टंचाईग्रस्त भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा आणि विहिरींचे अधिग्रहण करून पाणी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्याची परिस्थिती लक्षात घेता प्रत्येकाने पाण्याचा थेंब न् थेंब वाचवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अनधिकृत बोअरवेलवर निर्बंध

महाराष्ट्र भूजल अधिनियम, २००९ नुसार सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या घोषित स्रोतांपासून ५०० मीटर परिसरात अन्य प्रयोजनांसाठी नवीन विहीर किंवा कूपनलिका खोदण्यावर निर्बंध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात ६० मीटरपेक्षा अधिक खोलीचे बोअरवेल खोदण्यास मनाई असून, परवानगीशिवाय नवीन बोअरवेल खोदल्यास रिग मशीन जप्त करणे आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाऊ शकते. १०० चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या इमारती व सोसायट्यांमध्ये पावसाचे पाणी साठवणे आणि बोअरवेलचे पुनर्भरण करणे बंधनकारक राहणार आहे.

पाण्याचा अपव्यय केल्यास कारवाई

पाणीटंचाई संपेपर्यंत घरगुती नळ किंवा बोअरवेलच्या पाण्याने दुचाकी व चारचाकी वाहने धुण्यास, तसेच रस्ते आणि अंगणात पाणी मारण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाहने स्वच्छ करण्यासाठी ओल्या कपड्याचा वापर करावा. खासगी व व्यावसायिक स्विमिंग पूल बंद ठेवावेत आणि नवीन बांधकामांसाठी पिण्यायोग्य पाणी वापरू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. घरांमधील व सोसायट्यांमधील नळ आणि पाण्याच्या टाक्यांची गळती तातडीने दुरुस्त करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in