बहीण-भावाचा कालव्यात बुडून मृत्यू

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील शिरसवडी येथील तळेवस्ती येथील उरमोडी कालव्यामध्ये बहीण-भावाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली.
बहीण-भावाचा कालव्यात बुडून मृत्यू
Published on

कराड : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील शिरसवडी येथील तळेवस्ती येथील उरमोडी कालव्यामध्ये बहीण-भावाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. यातील ५ वर्षांची बालिकेचा मृतदेह मंगळवारी सायंकाळीच सापडला होता, मात्र ७ वर्षीय मुलाचा मृतदेह बुधवारी सकाळी गोपूज हद्दीतील आरे नावाच्या शिवारा नजिकच्या कालव्यामध्ये सापडला. रिया शिवाजी इंगळे, सत्यम उर्फ गणू शिवाजी इंगळे अशी मृत बालकाची नावे आहेत.

शिरसवडी येथील खोल ओढा शिवारातील शिवाजी नाना इंगळे यांचा मुलगा गणू व मुलगी रिया हे दोघे शाळेतून मंगळवारी दुपारी घरी आले होते. रिया ही गोपूज येथील अंगणवाडीत, तर गणू हा शिरसवडी भाग शाळेत इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत होता. शाळा सुटल्यानंतर घरी आल्यानंतर ते दुपारच्या सुमारास दोघेही घरी व परिसरात कोणीही नसल्याचे पाहून तेथील तळेवस्ती येथील कालव्याच्या परिसरात गेले होते व तेथूनच दोघेही बेपत्ता झाले होते.

सायंकाळी घराचे सर्वजण कामधंदा आटोपून घरी आले तर दोघेही मुले बेपत्ता असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांचा शोध सुरू केला असता रियाचा मृतदेह शिरसवडी व गोपुज गावच्या शिवेवर असणाऱ्या शेरीवस्ती येथे उरमोडी कालव्याच्या पाण्यामध्ये आढळून आला, तर गणू याचा शोध आज सकाळपर्यंत सुरू होता. शोध सुरू असतानाच शिरसवडी ते सिद्धेश्वर कुरोली यादरम्यान कालवा परिसरात गणू याचा मृतदेह आढळून आला.

logo
marathi.freepressjournal.in