साताऱ्यात धरणांच्या पाणीपातळीत वाढ; कोयना, वीरमधून विसर्ग सुरू, लघु व मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे कोयना, धोम, धोम बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी, वीर धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कोयनेच्या पायथा वीज गृहातून तर वीर व कण्हेर धरणांच्या दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सातारा जिल्ह्यात २० लघु व मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.
साताऱ्यात धरणांच्या पाणीपातळीत वाढ; कोयना, वीरमधून विसर्ग सुरू, लघु व मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले
Published on

कराड : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे कोयना, धोम, धोम बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी, वीर धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कोयनेच्या पायथा वीज गृहातून तर वीर व कण्हेर धरणांच्या दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सातारा जिल्ह्यात २० लघु व मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. रविवारीही उघडझाप करणाऱ्या पावसाने डोंगरदऱ्यात जोरदार बॅटिंग केली. धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

साताऱ्यातील वीरधरणातून आज दुपारी १२ वाजल्यानंतर धरणाच्या विद्युतगृहाद्वारे २ हजार १०० क्युसेक तर सांडव्याद्वारे ४ हजार ६३७ क्युसेक असे मिळून ६ हजार ७३७ क्युसेक विसर्ग निरा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. कराड,पाटण तालुक्यांतील तर कोरेगाव तालुक्यातील देऊरसह अन्य लघुप्रकल्प सध्या १०० टक्के भरल्याने त्यांच्या सांडव्यावरुन जलप्रवाह सुरु झाला आहे.

जिल्ह्यातील धरणातील पाण्याची स्थिती अशी -

धोम बलकवडी धरण : धोमबलकवडी धरणात आजचा पाणीसाठा ०.६७० टीएमसी आहे. आजची उपयुक्त टक्केवारी १३.८९ टक्के असून धरणात पाण्याची आवक ५६० क्युसेक होत आहे.

कण्हेर धरण : कण्हेर धरणात आजचा पाणीसाठा ५.६२० टीएमसी आहे. आजची उपयुक्त टक्केवारी ५३. २८ टक्के असून धरणात पाण्याची आवक ५९३ क्युसेक आहे. चारही दरवाजातून पाणी सोडण्यात येत आहे.

कोयना धरण : कोयना धरणात आजचा पाणीसाठा ३६.५६० टीएमसी असून आजची उपयुक्त टक्केवारी ३१.४० टक्के आहे. धरणात पाण्याची आवक २० हजार ९११ क्युसेक असून १ हजार ५० क्युसेक विद्युत गृहातून विसर्ग सोडण्यात येत आहे.

धोम धरण : धोम धरणात आजचा पाणीसाठा ७.०१० टीएमसी आहे. आजची उपयुक्त टक्केवारी ४४.४८टक्के असून धरणात पाण्याची आवक २ हजार ३५ क्युसेक होत आहे.

उरमोडी धरण : उरमोडी धरणात आजचा पाणीसाठा ५.४४० टीएमसी असून आजची उपयुक्त टक्केवारी ५३.०६ टक्के आहे. धरणात पाण्याची आवक २ हजार ७१२ क्युसेक होत आहे.

तारळी धरण : तारळी धरणात आजचा पाणीसाठा २.०७० टीएमसी असून आजची उपयुक्त टक्केवारी ३५.२७ टक्के आहे. धरणात पाण्याची आवक १ हजार ६९५ क्युसेक होत आहे.

मध्यम प्रकल्प असलेले धरण

जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात देखील पाणीसाठा वाढला आहे. यामध्ये येरळवाडी, नेर, राणंद, आंधळी ही धरणे १०० टक्के भरली आहेत. नागेवाडी ५०.९६ टक्के, मोरणा ६५.०८ टक्के, उत्तरमांड ६९.५३ टक्के, महू ३५.६९ टक्के, हातगेघर ४७.६० टक्के, वांग मराठवाडी ५२.४३ टक्के पाणीसाठा झाला आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
सातारच्या पश्चिमेकडे असलेल्या कण्हेर धरण क्षेत्रात झालेल्या संततधार पावसामुळे धरणात मुबलक पाणीसाठा झाला आहे. सध्या धरणात ५७ टक्के इतका पाणीसाठा झाल्याने रविवारी सायंकाळी धरणाचे चारीही दरवाजे १० सेंटिमीटरने उचलून प्रतिसेकंद १००० क्युसेक्स पाणी सांडव्यावरून वेण्णा नदी पात्रात, तर विद्युतगृहातून ५०० क्यूसेक्स असे एकूण १५०० क्यूसेक्स पाणी सोडण्यात आले.नदीपत्रात पाणी सोडण्याच्या नियोजनानंतर नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणाच्या पश्चिमेकडे असलेल्या महाबळेश्वर भागात गेल्या चार ते पाच दिवसापासून धुवाधार पर्जन्यवृष्टी झालेली आहे.दररोज धरणपत्रात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण, सांडवमाथा पातळीस लागलेले पाणी व पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेऊन धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
logo
marathi.freepressjournal.in