...तर सर्व वाहने ‘मोफत’ सोडणार

सातारा जिल्हावासिय टोल मुक्तीसाठी आक्रमक
...तर सर्व वाहने ‘मोफत’ सोडणार

कराड : सातारा जिल्ह्यातील जनतेच्या माथी कराड शहराजवळील तासवडे व खंडाळा तालुक्यातील शिरवळजवळचा आनेवाडी हे दोन टोलनाके शासनाने मारले आहेत. या दोन्ही टोलनाक्याच्या विरोधात सातारा जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेना शिंदे गट वगळता सर्व पक्ष टोलनाके हद्दपार करा, या भूमिकेत आहेत. राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनीही पाठीमागे जिल्ह्यातून दोन्ही टोल नाके हद्दपार करा, अशी मागणी राज्य व केंद्र सरकारकडे केली होती. आताही मनसेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार सातारा शहराचे शहर प्रमुख राहुल पवार यांनी जिल्ह्यातून वरील दोन्ही टोल नाके हद्दपार करा, अन्यथा मनसेच्या स्टाईलने सर्व वाहने फ्री सोडली जातील, असा इशारा दिला आहे. तसेच लोकजनशक्तीपार्टीतर्फे पदाधिकाऱ्यांनीही प्रशासनाला निवेदन देत सदर टोलनाके तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे.

सातारा जिल्ह्यातून १२५ कि.मी.चा पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग जातो.पूर्वी चार पदरी महामार्ग होण्याच्या अगोदर खंडाळा तालुक्यातील शिरवळनजिक टोलनाका होता तर सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांची हद्द ओलांडताना वाठार किणीजवळ एक टोलनाका होता. परंतु महामार्ग झाला अन् टोलनाके हे तासवडे आणि आनेवाडी येथे आणण्यात आले. आनेवाडी येथे टोलनाका आणल्यापासून या भागात गुन्हेगारी वाढली आहे तर स्थानिक वाहनांना टोलनाक्याचा त्रास होवू लागला. स्थानिक टोलनाक्यावरून शेजारील गावातील वाहन धारकांना जाताना येताना टोल मोजावा लागतो. सातारा जिल्ह्यातील नागरिकांना टोल माफ व्हावा, यासाठी सातत्याने आजपर्यंत आंदोलने झालेली आहेत. राष्ट्रवादीचे आमदार आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनीही आंदोलने केलेली होती. मात्र, टोलनाक्याचे आंदोलन थांबले पण तोल नाके काही बंद झाले नाहीत.

दरम्यान, नुकतेच मागच्या महिन्यात रिपाइंच्या गवई गटाने आंदोलन करुन तोल नाके बंद करण्याचा इशारा दिलेला होता. आता एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरुन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इशारा देत वरळी आणि पनवेल येथील टोलनाक्यावर वाहने फ्री सोडण्याचा उपक्रम राबवला. त्यावरुन त्यांचे कार्यकर्तेही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्याच धर्तीवर सातारा जिल्ह्यातील टोलनाक्याच्या विरोधात जिल्ह्यातील मनसे आक्रमक झाली असून जिल्ह्यातील एमएच ११ आणि एमएच ५० या दोन्ही पासींगच्या गाड्यांना टोल फ्री करावे, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करावे लागेल, असा इशारा राहुल पवार यांनी दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in