सातारा, कराड, फलटण रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने अमृत भारत स्थानक योजना हाती घेतली आहे
सातारा, कराड, फलटण रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट

कराड : भारतीय रेल्वे मंत्रालयाने देशभरातील रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी 'अमृत भारत योजना' हाती घेतली असून, या योजनेत देशभरातील १३०९ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड व फलटण रेल्वे स्थानकांचा समावेश असून, लवकरच या रेल्वे स्थानकांच्या विकासाचे काम सुरू होणार आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने अमृत भारत स्थानक योजना हाती घेतली आहे. या योजनेतून विकास करण्यासाठी १३०९ रेल्वे स्थानकांची निवड करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक प्रवासी असणाऱ्या सातारा आणि कराड, तर नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या फलटण या रेल्वे स्थानकांची निवड करण्यात आली आहे. दीर्घकालीन दृष्टिकोनातून रेल्वे स्थानकांचा विकास करण्यावर या योजनेत भर देण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे स्थानकांचा विकासाचा आराखडा तयार करून नियोजन करण्यात येणार आहे. आराखडा तयार करताना प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या दैनंदिन प्रवासी संख्येचा विचार केला जाणार आहे. प्रवाशांना केंद्रित धरून सुविधांची निर्मिती केली जाणार आहे. ती करताना सध्याची स्थानकाची रचनाही विचारात घेतली जाणार आहे. रेल्वे स्थानकाचे बाह्यरूप आणि अंतर्गत रूप याचाही विचार केला जाणार आहे. रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक सुधारणा, परिसराचे सुशोभीकरण, स्थानकाच्या प्रवेशद्वाराचा विकास, प्रवाशांसाठी प्रतीक्षागृहांची उभारणी, स्वयंचलित जिने, स्थानकाच्या अंतर्गत रचनेत सुधारणा, स्वच्छतागृह सुधारणा, एक देश-एक उत्पादन योजनेंतर्गत विक्री केंद्र, मोफत वायफाय किऑस्क आदी सुविधांची उभारणी या योजनेंतर्गत करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in