Satara : बिबट्याच्या बछड्यांचे आईशी पुनर्मिलन; दोन दिवसांच्या मोहिमेनंतर मादी जेरबंद

आई आणि तिच्या पिल्लांमधील मायेचे नाते केवळ माणसांमध्येच नव्हे, तर वन्यप्राण्यांमध्येही तितकेच घट्ट असते.
Satara : बिबट्याच्या बछड्यांचे आईशी पुनर्मिलन; दोन दिवसांच्या मोहिमेनंतर मादी जेरबंद
Satara : बिबट्याच्या बछड्यांचे आईशी पुनर्मिलन; दोन दिवसांच्या मोहिमेनंतर मादी जेरबंद
Published on: 

कराड : आई आणि तिच्या पिल्लांमधील मायेचे नाते केवळ माणसांमध्येच नव्हे, तर वन्यप्राण्यांमध्येही तितकेच घट्ट असते. याचा प्रत्यय सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसनगाव-शहापूर येथे आला. ऊसतोडणी सुरू असताना अवघ्या आठ ते दहा दिवसांचे बिबट्याचे दोन बछडे आढळून आले. या बछड्यांना त्यांच्या आईपासून वेगळे न करता पुन्हा तिच्या कुशीत पोहोचविण्यासाठी वनविभागाने विशेष मोहीम राबवली.

अखेर अथक प्रयत्नांनंतर मादी बिबट्या आणि तिच्या दोन्ही बछड्यांचे पुनर्मिलन घडवून आणण्यात वनविभागाला यश आले. आसनगाव-शहापूर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी आणि ग्रामस्थांना बिबट्याचे वारंवार दर्शन होत होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते. दोन दिवसांपूर्वी शहापूर येथील शेतकरी पुरुषोत्तम मारुती माने यांच्या काळाकडा नावाच्या शिवारातील उसाच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना कामगारांना बिबट्याचे दोन बछडे आढळून आले.

ही मोहीम उपवनसंरक्षक धैयशील पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक दिगंबर जाधव यांच्या नेतृत्वाखाली, कोरेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रहार जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

कॅमेरे आणि पिंजऱ्यांच्या मदतीने शोधमोहीम

बछडे आढळलेल्या परिसरात कॅमेरे लावून मादी बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. तसेच तिला सुरक्षितपणे पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले. अखेर मादी बिबट्या पिंजऱ्यात अडकली. त्यानंतर तिला दोन्ही बछड्यांजवळ नेण्यात आले. मादीने आपल्या पिल्लांना जवळ घेतल्याने पुनर्मिलनाची मोहीम यशस्वी झाली. तिन्ही बिबट्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

वनविभागाच्या तत्परतेचे कौतुक

बछडे आढळल्यानंतर मादी बिबट्या परिसरात येण्याची शक्यता लक्षात घेऊन वनविभागाने पाळत ठेवली होती. मादी घटनास्थळी आली होती; मात्र तिने पिल्लांना सोबत नेले नाही. त्यामुळे बछड्यांना सुरक्षित ताब्यात घेऊन मादीचा शोध सुरू करण्यात आला. अखेर मादीला पकडून दोन्ही बछड्यांसह नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी चंद्रहार जगदाळे यांनी दिली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)