शिंदे गटाच्या पुरुषोत्तम जाधव यांनी मागितली पवारांकडे उमेदवारी

राजकारणात कोणीच कोणाचा मित्र नसतो कि कोणीच कोणाचा शत्रूही नसतो आणि त्याचे अनेक दाखले अलिकडील राजकारणात दिसू लागले आहेत. सध्याच्या सत्ताधारी महायुतीचा प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव हे महायुतीतून सातारा लोकसभा मतदार संघासाठी इच्छूक आहेत.
शिंदे गटाच्या पुरुषोत्तम जाधव यांनी मागितली पवारांकडे उमेदवारी

कराड : मी सन २००९ आणि २०१४ च्या लोकसभेची निवडणूक लढवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशात लाट होती, तेव्हाही मला सातारा लोकसभा मतदारसंघात क्रमांक दोनची मते मिळाली होती. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी मला उमेदवारी मिळावी,असे केवळ मलाच वाटत नाही तर या मतदारसंघातील मतदारांनाही वाटत आहे. त्यामुळे मला नक्की कोणी तरी उमेदवारी देईल, यासाठी मी देवेंद्र फडणवीसांना भेटलोय, मी अजित पवारांना भेटलोय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे तर मी काम करतो आहे. इतकेच काय सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. ज्येष्ठ नेते खा. शरद पवार हे तर मुळचे आमच्याच जिल्ह्याचे आहेत, त्यांच्या भेटीमागे मला लोकसभेचा 'किताब' पटकवायचा आहे, अशी सारवासारव करत आपण चक्क शरद पवारांनाही भेटल्याचे व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाकडेही आगामी लोकसभेसाठी साताऱ्यातील उमेदवारीची मागणी केल्याचे स्पष्ट प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी शुक्रवारी सायंकाळी 'नवशक्ति'शी बोलताना केल्याने साताऱ्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप होण्याच्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

राजकारणात कोणीच कोणाचा मित्र नसतो कि कोणीच कोणाचा शत्रूही नसतो आणि त्याचे अनेक दाखले अलिकडील राजकारणात दिसू लागले आहेत. सध्याच्या सत्ताधारी महायुतीचा प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव हे महायुतीतून सातारा लोकसभा मतदार संघासाठी इच्छूक आहेत. मात्र हा मतदारसंघ महायुतीमध्ये कोणाकडे जाणार व कोणाला उमेदवारी दिली जाणार यावरून या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. महायुतीमध्ये भाजपकडून उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचार सुद्धा सुरू केला आहे तर अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून या मतदार संघावर दावा केला आहे. साताऱ्याचा असा हा राजकीय गुंता वाढला असतानाच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार यांचीच मुंबई येथे त्यांच्या 'सिल्व्हर ओक'वर भेट घेत त्यांनी सातारा लोकसभा मतदार संघातून आपल्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्याबाबतची इच्छा व्यक्त केली आहे

मी शरद पवार साहेबांची भेट घेतली आहे. खरे तर ८३ वर्षांचा लढवय्या योद्धा यांना भेटायला आलो होतो. त्यांचे जसे कुस्तीवर प्रेम आहे तसेच मी पण कुस्तीवर प्रेम करणारा आहे. त्यामुळे सध्या जे देशामध्ये राजकीय वातावरण आहे त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेचा 'किताब' पटकावयचा आहे.

महायुतीचे जिल्हाध्यक्ष पदासारख्या मोठ्या जबाबदार पदावर काम करणारा पदाधिकारी ऐनवेळी पक्ष आदलाबदल करत महाआघाडीकडून उमेदवारी मिळवू शकला तर साताऱ्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचेच हे द्योतक मानण्यात येत आहे .

मी उमेदवारीवर दावा करण्यासाठी नाही तर सर्वसामान्य जनतेसाठी काम करतो, सर्वसामान्यांसाठी माझा उमेदवारीवर दावा आहे. त्यामुळे शरद पवार माझा नक्की विचार करतील, असा विश्वास आहे. मी सातारा लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. यापूर्वी मी दोन वेळा सन २००९ ला सेना-भाजपचा उमेदवार म्हणून, तर सन २०१४ ला अपक्ष म्हणून लढलो आहे. त्यावेळी नरेंद्र मोदी साहेबांच्या लाटेमध्ये मला दोन क्रमांकाची मते मिळाली होती. सन २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत मी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, मला त्यावेळी थांबवण्यात आले. मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि सातारा जिल्हा विकासापासून वंचित आहे.

- पुरुषोत्तम जाधव, सातारा जिल्हाप्रमुख शिंदे गट

logo
marathi.freepressjournal.in