
रामभाऊ जगताप/कराड
नैसर्गिक मृत्यूपेक्षा अपघाती मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून सातारा जिल्ह्यात केवळ एका एप्रिल महिन्यात तब्बल ५२ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या अपघाताचे एकमेव कारण हायस्पीड हे आहे. आपल्या कर्त्या पुरुषाच्या मृत्यूमुळे अनेक कुटुंबांची अक्षरश: वाताहत झाली आहे.
आपल्या घरातील कर्ता पुरुष सकाळी घरातून कामावर जातो. मात्र, संध्याकाळी तो सुरक्षित परत येईल की नाही, याचा सध्या कोणालाही भरवसा नाही. रस्ते चकाचक झाले पण त्याच परिणामी वाहनांचे वेग वाढले. मात्र, गाडीवर भरवसा ठेवून वाहनचालकांचा अतिवेग नडत आहे. अपघात हा कधीही सांगून होत नाही. पण खबरदारी घ्यावी लागते. वाहनचालक आपल्याच धुंदीत, घाईगडबडीत, अतिआत्मविश्वास ठेवून वाहने हायस्पीडने चालवत आहेत. यामुळे स्वत:सह दुसऱ्याच्या आयुष्याचीही राखरांगोळी करत आहेत. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्रत्येक अपघातावेळी पोलिसांच्या निदर्शनास येते. सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना वाहनचालक करत नाहीत. बरेच कारचालक सीटबेल्ट न लावता व दुचाकीचालक हेल्मेट न घालता वाहन चालवतात. मात्र याचवेळी महामार्गापासून ते ग्राम रस्त्यांपर्यंत सर्रास सर्वच रस्त्यांची वाट लागली असल्याने प्रामुख्याने अशावेळी अपघात झाल्यास दुर्दैवाने वाहनचालकांचा जागीच मृत्यू होतो आहे.
अतिवेग प्रवास अपघातास कारण
महामार्गावर सध्या काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत पाणी साचत असल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. सदर खड्डे बुजवण्याचे ना संबंधित विभागाला गांभीर्य ना शास्नानाला देणे-घेणे, तरीसुद्धा अनेक वाहनचालक १०० ते ११० च्या स्पीडने वाहने चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. अशा वेळी खड्ड्यात गाडी आदळून चालकाचे नियंत्रण सुटत आहे.
महामार्गावर अधिक अपघात
सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग व आंतरजिल्ह्यातील रस्त्यांवर एप्रिल महिन्यांत ९८ अपघात झाले. यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर १७ अपघात झाले असून, यात ५ जण ठार झाले. राज्यमार्गावर २१ अपघात झाले असून, यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला तर आंतरजिल्हा मार्गावर ६० अपघात झाले. यात सर्वाधिक ३५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे एप्रिल महिन्यात एकूण ५२ जणांचा हायस्पीडने बळी घेतला आहे.