गावातील निवडणुकीत शरद पवार गटाने 'चिठ्ठी'ने केला शिंदे गटाचा पराभव
कराड : पाटण तालुकाच काय पण पाटण विधानसभा मतदार संघ म्हंटलं की, तेथील पारंपरिक देसाई गट विरुद्ध पाटणकर गट असे राजकीय सुत्र ठरलेलेच म्हणून समजायचे. हे आता प. महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झाले आहे. स्व. बाळासाहेब देसाई यांच्यापासून ते त्यांचे नातू व शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या राजकीय कारकिर्दीत या देसाई गटाला माजी मंत्री व पाटणचे माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या गटाने नेहमी राजकीय संघर्ष केला आहे. सध्या पाटण मतदार संघ आमदार म्हणून शंभुराज देसाई यांच्या ताब्यात आहे. त्यातच ते विद्यमान मंत्रीही असल्याने त्यांना त्यांच्या या मतदार संघात कुणीच कोणत्याही निवडणुकीत पराभूत करू शकत नाही, असा मंत्री देसाई यांचा विश्वास असल्याचे त्यांचे कार्यकर्ते बोलून दाखवत असतात; मात्र, या मतदारसंघात एकहाती सत्ता असतानाही देसाई यांच्या गटाचा एका निवडणुकीत केवळ 'चिठ्ठी'ने 'धोका' दिल्याने पराभव झाला आहे आणि तोही त्यांच्या पारंपरिक विरोधी गट राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून झाला आहे, हे विशेष.
पाटण विधानसभा मतदार संघात नुकतीच एक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाचा खा. शरद पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या गटाने पराभव केला. पाटण विधानसभा मतदार संघातील पण पाटण तालुक्यातीलच निसरे गावच्या श्री सोमाईदेवी सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या संचालक मंडळाच्या अत्यंत अटीतटीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत चार उमेदवारांना समान मते मिळाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिठ्ठीने निर्णय घेतला असता, त्यामध्ये ना शंभूराज देसाई यांच्या शिवसेना शिंदे गटाला पाटणकर गटाने जोरदार धक्का दिला. मंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाच्या पॅनेलचा ७ विरुद्ध ६ने पराभव केल्याने या संस्थेवरील पाटणकर गटाची सत्ता अबाधित राहिली असून देसाई गटाला मात्र,'चिट्टी' ने 'धोका' दिला आहे.
पाटण विधानसभा मतदार संघातील निसरे, ता पाटण येथील श्री सोमाईदेवी सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. या संस्थेचे कार्यक्षेत्र तालुक्यातील निसरे, आबदारवाडी, गिरेवाडी या गावांचे आहे तर एकूण ३५० एकर क्षेत्र संस्थेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या या गावांमध्ये १३ जागांसाठी झालेल्या मतदानात निवडणुकीत प्रथमच अटीतटीची झाली.पारंपारिक राजकीय विरोधक असलेल्या देसाई आणि पाटणकर (शरद पवार ) या दोन गटांत लढत झाली. या संस्थेचे एकूण ५६५ सभासद आहेत. यातील ३२७ सभासद मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये १३ मतपत्रिका बाद झाल्या. संचालक पदांच्या १३ जागांसाठी झालेल्या मतदानात चार जागांना समान मते मिळाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या प्रसाद गुरव यांनी 'चिट्टी' द्वारे अंतिम निर्णय घेण्याचे ठरवत तसे केले असता 'चिट्टी' ने पाटणकर गटाच्या बाजूने कौल दिल्याने पाटणकर गटाने ७ विरुद्ध ६ ने बाजी मारत पाटणकर गटाने संस्थेवरील आपली सत्ता अबाधित राखली असून, देसाई गटाला मात्र, पराभवाला सामोरे जावे लागले.